पाणी देऊन भागवली गावांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2016 12:49 AM2016-04-23T00:49:59+5:302016-04-23T00:49:59+5:30

गावाचे सरपंच राजेंद्र झोंड यांनी स्वत:च्या विहिरीतून रावणगाव, नंदादेवी, खडकी, आणि स्वामी चिंचोली गावासाठी मोफत पाण्याचे टँकर भरून देऊन या गावातील लोकांची तहान भागवली आहे

Thirst for villages filled with water | पाणी देऊन भागवली गावांची तहान

पाणी देऊन भागवली गावांची तहान

Next

राजेगाव : खानवटे (ता. दौंड) गावाचे सरपंच राजेंद्र झोंड यांनी स्वत:च्या विहिरीतून रावणगाव, नंदादेवी, खडकी, आणि स्वामी चिंचोली गावासाठी मोफत पाण्याचे टँकर भरून देऊन या गावातील लोकांची तहान भागवली आहे. एकप्रकारे आजच्या दुष्काळी परिस्थितीत या गावाला जलदूत म्हणून धावून आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विजेचा लपंडाव सुरू असल्याने सरपंच झोंड यांनी टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी विहिरीवर स्व:खर्चाने डिझेल इंजिन बसवून दिले आहे.
पाणीटंचाई लक्षात घेऊन गटविकास अधिकारी दौंड यांनी खानवटेच्या ग्रामपंचायतीला टँकर भरून देण्याची सूचना केल्याने पाणी भरायला सुरुवात झाली होती. काहींनी त्यांच्या या कार्यावर राजकारणही केले; मात्र त्यांनी त्यांचे कार्य सुरूच ठेवले. पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासला धरणातून सोडण्यात आलेले पाणी पाटबंधारे विभागाच्या नियोजनाभावी दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पूर्ण क्षमतेने न पोहोचल्याने रावणगाव, नंदादेवी, खडकी आणि स्वामी चिंचोली या गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. शासनाने या गावांना टँकर उपलब्ध करून दिले आहेत. परंतु, पाणी कोठून भरायचे, हा प्रश्न या पडला होता. राजेंद्र झोंड आणि ग्रामस्थ सोमनाथ पतुरे हे जलदूताप्रमाणे या गावांसाठी धावून आले असून, सरपंच झोंड हे रावणगाव, स्वामी चिंचोली व खडकी तर सोमनाथ पतुरे हे नंदादेवी गावाला पाणी देत आहेत.
> ...अन् पाच एकर ऊस क्षेत्र सोडून दिले
सामाजिक बांधिलकी जोपासत खानवटेचे सरपंच राजेंद्र झोंड यांनी आपल्या विहिरीवर ओलिताखाली असलेले ५ एकर ऊसशेतीचे पाणी बंद करून हे पाणी रावणगाव, नंदादेवी, खडकी, आणि स्वामी चिंचोली गावांसाठी मोफत दिले.
त्याचबरोबर परिसरात विजेची समस्या असल्यामुळे त्यांनी स्वखर्चातून डिझेल इंजिन या विहिरीवर बसवून विहिरीतील पाणी या डिझेल इंजिनद्वारे उपसून टँकरमध्ये भरण्याचे काम करीत आहेत.
> आम्हाला सरपंच झोंड दररोज लागणारे पाणी देत आहेत; परंतु चार गावचे टँकर एकाच ठिकाणी असल्याने भरायला उशीर होत होता. हे येथील ग्रामस्थ सोमनाथ पतुरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वत:हून आमच्या गावासाठी टँकर भरून द्यायला सुरुवात केली आहे. दोघांचे आभार मानायला आमच्याकडे शब्दच नाहीत.
- रमेश कोकणे
सरपंच, नंदादेवी

Web Title: Thirst for villages filled with water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.