पुणे जिल्ह्यातील दीड हजार दिव्यांगांना मिळाले छत; जिल्हा परिषदेने दिले १४ कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:11 PM2017-12-15T13:11:04+5:302017-12-15T13:14:58+5:30
जिल्हा परिषदेने गेल्या चार वर्षांत तीन टक्के दिव्यांग कल्याणकारी निधी अंतर्गत १ हजार ७०५ दिव्यांगांना घरासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
पुणे : जिल्हा परिषदेने गेल्या चार वर्षांत तीन टक्के दिव्यांग कल्याणकारी निधी अंतर्गत १ हजार ७०५ दिव्यांगांना घरासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. इतर योजनांवर मिळून १९ कोटी ५१ लाख रुपये खर्च केले आहेत.
पर्सन विथ डिसअॅबिलिटी अॅक्टनुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या उत्पन्नापैकी ३ टक्के निधी दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्याअंतर्ग जिल्हा परिषदेने २०१३-१४ पासून २०१६-१७ पर्यंत १९ कोटी कोटी ५१ लाख १३ हजार ७७१ रुपयांचा निधी खर्च केला असून, ३ हजार ७८५ दिव्यांगांना त्याचा फायदा मिळाला आहे. त्यातील १ हजार ७०५ दिव्यांगांना घरासाठी १४ कोटी ३० लाख ३१ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. जिल्हा परिषदेने २०१७-१८ या वर्षासाठी देखील ५ कोटी ६ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
घरकुल व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या वतीने पिठ गिरणी, लोखंडी स्टॉल आणि फॉल पिको या कालबाह्य झालेल्या पारंपरिक साधनांवर ५ कोटी २० लाख ८१ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. त्याचा २ हजार ८० दिव्यांगांनी फायदा घेतला आहे. जिल्हा परिषदेने २०१३-१४मध्ये पिठ गिरणी, लोखंडी स्टॉल आणि घरकुलासाठी ३ कोटी २३ लाख ३१ हजार रुपये खर्च केले. त्याचा फायदा ८१७ दिव्यांगांनी घेतला. तर, २०१४-१५ साली १ हजार ४१ जणांना ५ कोटी २९ लाख ५६ हजार रुपयांचा निधी खर्च केला. २०१५-१६ साली १ हजार ३०३ दिव्यांगांना ६ कोटी ७४ लाख २४ हजार रुपयांचा निधी खर्च केला असून, २०१६-१७ साली ४२४ जणांना ४ कोटी २४ लाख रुपये घरकुलासाठी देण्यात आले. प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे धर्मेंद्र सातव आणि सुरेखा ढवळे यांनी ही माहिती मिळविली आहे.