हडपसरमध्ये लसीकरणाचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:09 AM2021-04-14T04:09:13+5:302021-04-14T04:09:13+5:30
हडपसर परिसरात कोविडचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येथील अनेक नागरिकांना लसीकरण केंद्र कोठे आहे, हे माहिती नाही. या केंद्रावर ...
हडपसर परिसरात कोविडचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येथील अनेक नागरिकांना लसीकरण केंद्र कोठे आहे, हे माहिती नाही. या केंद्रावर लावण्यासाठी महापालिकेने तयार केलेले फलक गेले आठ दिवसांपासून पडून आहेत. पालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना ते लावण्यासाठी वेळ नसल्याचे दिसत आहे. यामुळे लस घेणा-यांना जागोजागी लसीकरण केंद्रांबाबत चौकशी करावी लागत आहे.
हडपसर महापालिकेचा सक्षम आरोग्य केंद्र नसून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल, तर लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. शिवसेनेने वारंवार केंद्र संख्या वाढवण्याची मागणी लावून धरली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. लवकरात लवकर लसीकरण केंद्र चालू केले नाही. तर सहायक आरोग्य प्रमुख यांच्या कार्यालयाबाहेर उपोषण केले जाईल, असे शिवसेनेच्या वतीने उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर यांनी सांगितले.
बनकर कोविड सेंटरमध्ये कर्मचारी संख्या अत्यंत कमी असून उपस्थित कर्मचाऱ्यांना ताण निर्माण होत आहे. ऑक्सिजन बेड चालू करतो म्हटले पण ते सुद्धा चालू केले नाही. बनकर कोविड सेंटरमध्ये तातडीने कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी महेंद्र बनकर यांनी केली.
खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर मिळतील, असे आदेश निघून पाच दिवस झाले. तरी आदेशानुसार अजूनही खासगी रुग्णालय रुग्णांना बाहेरून आणायला सांगितले जाते. बाहेर कुठेच हे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक संभ्रमावस्थेत सैरभैर झाले आहेत.
---------------
फोटो- पालिकेने तयार केलेले फलक लावण्यावाचून पडून आहेत.(छायाचित्र-जयवंत गंधाले)