दीड महिन्यानंतरही ३८ हजार विद्यार्थी गणवेशाविना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 03:33 PM2019-07-24T15:33:21+5:302019-07-24T15:41:11+5:30
दीड महिन्यानंतर देखील ३० ते ४० टक्के विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे मिळालेले नाही...
पुणे : महापालिकेच्या शाळा सुरु होऊन दीड महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्यापही तब्बल ३८ हजार ५०० विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे मिळाले नाही. यामुळे जुने पुराणे गणवेश घालण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. येत्या जुलै अखेर पर्यंत शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
गणवेश व शालेय साहित्य खरेदीमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासनाने थेट विद्यार्थी अथवा पालकांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा करण्याचा (डीबीटी) निर्णय घेतला. त्यानुसार गतवर्षीपासून महापालिकेच्या वतीने देखील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला. परंतु, पहिल्या वर्षी देखील हजारो विद्यार्थ्यांचे बँक खाते नसल्याने गणवेशाचे पैसे वाटप करण्यामध्ये अडचण आली होती. यंदा देखील दीड महिन्यानंतर देखील ३० ते ४० टक्के विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे मिळालेले नाही. महापालिकेच्या प्राधमिक शाळांमध्ये ८५ हजार विद्यार्थी आणि माध्यमिक शाळांमध्ये ११ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी आता पर्यंत सुमारे ५८ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये ११ कोटी ५ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, येत्या जुलै अखेरपर्यंत शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये गणवेशाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. सध्या काही विद्यार्थ्यांनी दोन-दोन शाळांमध्ये प्रवेश अर्ज केले आहे, तर काही विद्यार्थी खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतात. यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास अडचण येते. तसेच इतर काही तांत्रिक कारणामुळे अडचणी येत आहेत, परंतु लवकरच शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणवेळ मिळेल, असा दावा अग्रवाल यांनी केला.
------------------
महापालिकेच्या प्राथमिक शाळा : १०५
प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या : ८५ हजार
गणवेशाचे पैसे बँक खात्यात जमा झालेले विद्याथीर् : ५१ हजार
माध्यमिक शाळा : १८
माध्यमिक शाळांचे एकूण विद्याथीर् : ११ हजार ५००
आता पर्यंत बँक खात्यात पैसे जमा झालेले विद्यार्थी : ७ हजार