उमेदुवारांसाठी थर्टीफस्ट ठरणार खर्चिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:10 AM2020-12-29T04:10:30+5:302020-12-29T04:10:30+5:30
कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने रात्रीची संचारबंदी जाहीर झाली असली तरी रात्री ११ वाजेपर्यंत का असेना नवीन वर्षाचे स्वागत ...
कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने रात्रीची संचारबंदी जाहीर झाली असली तरी रात्री ११ वाजेपर्यंत का असेना नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी युवा वर्गाची जय्यत तयारी सुरू
असून निवडणूकीमुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ढाबा व हॉटेल चालकही ३१ डिसेंबरसाठी सज्ज झाले आहेत.२३ डिसेंबर पासून ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मावळत्या वर्षाला निरोप दिला जाणार असल्यानेच याची रंगत अधिकच वाढणार आहे. यामध्ये मतदारांची खाण्यापिण्याची चंगळ व्हावी म्हणून गरीब बिचाऱ्या कोंबड्या, मेंढ्या व बोकडांचा मात्र मोठ्या प्रमाणात बळी जाणार आहे.
उमेदवारांसहीत कार्यकर्त्यांच्या काही गटांनी शेतात, काहींनी मित्रांच्या रिकाम्या घरात तर काहींनी नजीकच्या हॉटेल किंवा ढाब्यावर नियोजन केले आहे. कडक थंडी असली तरी उत्साह कमी झालेला नाही. सरते वर्ष व सामिष भोजन यांचे एक समीकरणच असते. परंतू यावर्षी निवडणूक असल्याने ३१ डिसेंबरच्या पार्टीचा भार उमेदवारांवर पडणार असल्याचे दिसते आहे. गावांगावांत त्यादृष्टीने चर्चा व नियोजनही सुरू झाले आहे. मांसाहारी जेवण बनविणारे अनेक आचारी असून विशेषत: मुस्लीम आचा-यांना दम बिर्याणी व डालचा खाना बनवण्यासाठी मागणी अधिक दिसत आहे.
--
निवडणूुक आयोगाचे पार्ट्यांवर असणार लक्ष
मुंबई सह, पुणे - सोलापूर, पुणे - नगर, पुणे - नाशिक, पुणे - बंगलोर या महामार्गलगत परिसरात हॉटेल व ढाब्यांची संख्या गेल्या काही वर्षात दुप्पट झाली आहे. पुणे - सासवड राज्यमार्गावरील वाहतूक वाढल्याने त्यामार्गावर हॉटेल व ढाब्यांची संख्या वाढली आहे. या सर्व ठिकाणी गावरान भाकरी व ठेच्यासह शाकाहारी, मांसाहारी जेवणात अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ढाबेचालकांनी साफसफाई, रंगरंगोटी, नवीन आसन व्यवस्थेसह विद्यूत रोषणाई आदी सर्व ती तयारी केली आहे. ३१ डिसेंबर निमित्ताने परराज्यातून व काही स्थानिक ठिकाणावरून बनावट मद्याचा पुरवठा होतो. असली दारूचा अंमल चढल्यावर ग्राहकांना पुढे नकली दारू दिली जाते. ती दारू स्पिरीट व रसायन मिश्रीत असून आरोग्याला हानीकारक असते. म्हणून अधिक पिणे धोकादायक ठरू शकते. सरत्या वर्षाला निरोपाचा पुरेपुर आनंद घेतांना मद्यपींना याबाबत सावधानता पाळावी लागणार आहे. अन्यथा नुतन वर्षाच्या सुरुवातीलाच रूग्णालयात दाखल होण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. या विशेष पार्ट्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदर ठिकाणी स्थानिक पोलीसांच्या मदतीने गस्त घालावी व कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. यामुळे अनेकांना तुरूंगाची हवा खावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.