इंदापूर शहरात 'ब्रेक दि चेन' साठी तीस आरोग्य पथके कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:11 AM2021-04-23T04:11:17+5:302021-04-23T04:11:17+5:30
इंदापूर : इंदापूर शहरात 'ब्रेक दि चेन' या मोहिमेंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि रुग्णांचा वाढता मृत्यूदर कमी करण्यासाठी, इंदापूर ...
इंदापूर : इंदापूर शहरात 'ब्रेक दि चेन' या मोहिमेंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि रुग्णांचा वाढता मृत्यूदर कमी करण्यासाठी, इंदापूर नगरपरिषदेचे कर्मचारी आणि शिक्षकांच्या मदतीने संपूर्ण शहरात ३० पथके कार्यरत केली आहे. या पथकांच्या माध्यमातून गुरुवारपासून कोरोना रुग्णांची शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे.
यासाठी प्रत्येक पथकामध्ये ३ कोरोना योद्धे आहेत.
इंदापूर शहरात सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा तीनशेपेक्षा अधिक झाला असून, आजतागायत ३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 'ब्रेक दि चेन' या मोहिमेंतर्गत कोरोना रुग्णांची शोधमोहीम चालू आहे.
आरोग्य पथक शहरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांच्या शरीराचे तापमान व ऑक्सिजन पातळी तपासणार आहेत. मात्र, यामध्ये सुरक्षित अंतराबरोबरच ऑक्सिमीटरच्या तपासणीनंतर नागरिकांना सॅनिटायझरने हात धुण्याच्या सूचना करणार आहेत. सुरू करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या शोधमोहिमेत इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे, नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, शिक्षक अरुण राऊत, दिपक राठोड, गजानन पुंडे, अल्ताफ पठाण, अशोक चिंचकर यांनी स्वतः सहभाग घेऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली.
इंदापूर शहर कोरोनामुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. शहरातील नागरिकांच्या जिवाला धोका होवू नये, त्याचबरोबर मृत्यूदर कमी करण्यासाठी युद्धपातळीवर नागरपरिषद प्रशासन काम करीत असून, या आरोग्य पथकात अधिकारी, कर्मचारी व शहरातील विविध शिक्षण संस्थेतील कर्मचारी काम पाहात आहेत. शहरातील नागरिकांनी आरोग्य तपासणीला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी केले आहे.
२२ इंदापूर आरोग्य
इंदापूरमध्ये नागरिकांत जनजागृती करताना नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व अधिकारी, कर्मचारी.