बाणेर रस्त्याच्या ‘तीस मीटर’चा झोल मेट्रोच्या मुळावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 12:24 PM2019-10-03T12:24:42+5:302019-10-03T12:31:33+5:30
मेट्रोला सात मीटर जागा सोडल्यावर रस्ता किती उरणार?
नीलेश राऊत -
पुणे : ‘पश्चिमेकडचा राजमार्ग’ म्हणून प्रसिद्ध पावलेला ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते बालेवाडी’पर्यंतचा बाणेर रस्ता तीस मीटरचा होणार असल्याचा गाजावाजा इतकी वर्षे करण्यात येत होता. मात्र, प्रस्तावित मेट्रोच्या कामांमुळे हा रस्ता धड २४ मीटरही नसल्याचे उघड झाले आहे. या अरुंद रस्त्याच्या मधोमध मेट्रो उभारणीकरिता सात मीटरची जागा लागणार आहे. या सात मीटरचा शोध घेताना मेट्रोच्या नाकी नऊ येत आहेत. सहा डब्यांची मेट्रो उभारताना या रस्त्यावरील वळणे, स्टेशन आदींच्या अनुषंगाने त्यांनी काढलेली मध्य रेषा आणि विकास आराखड्यानुसार (डीपी) असलेली रस्त्याची मध्यरेषा या अजिबात जुळत नाहीत. परिणामी मेट्रो, वाहतुकीचा रस्ता आणि पदपथ याचा मेळ कसा घातला जाणार, हे सध्या न सुटलेले कोडे आहे.
पुणे शहरातील तिसऱ्या टप्प्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील मेट्रो येत्या साडेतीन वर्षांत धावेल, अशी घोषणा नुकतीच करण्यात आली़ यानुसार संबंधित यंत्रणा कामालाही लागली, मात्र या मार्गाकरिता रस्त्याची मोजणी करताना, रस्त्यांची विकास आराखड्यातील (डीपी) रुंदी व प्रत्यक्षात असलेली रुंदी यातील प्रचंड तफावतीमुळे अंमलबजावणी यंत्रणेने प्रारंभीच हात टेकले आहेत़ या रस्त्याची कागदोपत्री असलेली रुंदी ग्राह्य धरून मेट्रोने कामाचे नियोजन सुरू केले. मात्र प्रत्यक्ष पाहणीत बाणेर रस्त्याची रुंदी कुठेही एकसमान आढळून आलेली नाही. एवढेच नव्हे, तर जी रुंदी २००८ च्या किंवा २०१७ च्याही विकास आराखड्यात दाखवलेली आहे, ती प्रत्यक्षात कुठेच नाही. रस्ता कमालीचा अरुंद असल्याने या अपुºया रस्त्याच्या मधोमध मेट्रोसाठी सात मीटरची जागा कुठून मिळवायची आणि रस्ते वाहतूक, पदपथाला किती जागा सोडायची, हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे या मार्गावरील मेट्रोचे स्वप्न साकारणे मोठे दिव्य ठरणार आहे़
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) केंद्र सरकारच्या २०१७ च्या नवीन मेट्रो रेल धोरणांतर्गत, सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) सुरू केलेला, ‘हिंजवडी ते शिवाजीनगर’ हा देशातील पहिला मेट्रो प्रकल्प आहे. पुणे महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ‘डीपी’तील रस्ता रुंदीची मापे ग्राह्य धरून ‘पीएमआरडीए’ने मेट्रोची आखणी चालू केली.
बाणेर रस्ता हा ३६ मीटर रुंदीचा असेल, असे ग्राह्य धरून काम सुरू झाले़ प्रत्यक्षात सन २००८ च्या शहराच्या ‘डीपी’नुसार बाणेर रस्ता आजपर्यंतही पूर्णपणे २४ मीटर रुंदीचा झालेला नाही़ त्यामुळे सन २००८ मध्येही राष्ट्रकुल स्पर्धेकरिता बालेवाडी क्रीडांगणाकडे जाण्याकरिताचा राजमार्ग बदलून तो पाषाणमार्गे तयार केला गेला़ पुढे सन २०१७ च्या ‘डीपी’त हाच बाणेर रस्ता ३० मीटर रुंदीचा नियोजित केला गेला़ शहराचा हा विकास आराखडा तयार करताना वस्तुस्थिती व प्रत्यक्ष जागेवरील परिस्थिती तशी नाही हे ज्ञात असतानाही तसे नियोजन केले गेले़ परंतु या सर्वांचा परिणाम आज ‘हिंजवडी-शिवाजीनगर’ मेट्रोला भोगावा लागणार आहे़
हिंजवडी ते शिवाजीनगर या २३़३ किलोमीटर अंतरात शहरातील इतर दोन मेट्रो मार्गांप्रमाणे सरळ रस्ता कुठेच नाही़ या मार्गावर सर्वात कठीण भाग हा बाणेर-बालेवाडी आहे़ येथे अनेक ठिकाणी वेडीवाकडी वळणे तसेच मुख्यत्वेकरून नियोजित रस्त्याच्याच भूसंपादनाचा अडसर आहे़
सन २००८ ला बाणेर रस्त्याच्या साडेसात किलोमीटर अंतराच्या कामाकरिता (पुणे विद्यापीठ चौक ते राधा चौक) दोन निविदा काढून सुमारे ८४ कोटी रुपयांची कामे विकसकास दिली गेली होती़ हे काम करताना कुठेही एकसमान ते होऊ शकले नाही़ रस्त्याच्या बाजूच्या भूधारक व सदनिकाधारकांनी न्यायालयात घेतलेली धाव, भूसंपादनास येणाºया अडचणी यामुळे हा साडेसात किलोमीटरचा रस्ता कधीच, कुठेही २४ मीटरचा अस्तित्वात येऊ शकला नाही.
गेल्या अकरा वर्षांनंतरही हा रस्ता काही ठिकाणी १५ मीटर, १८ मीटर, तर काही ठिकाणी २४ मीटर आहे़ अशा अडनिड्या रस्त्याच्या मधोमधची सात मीटरची जागा मेट्रोला
वापरायची आहे.
पुणे महापालिकेची यंत्रणाही हा रस्ता कुठेच २४ मीटरचा नसल्याचे मान्य करते़ तरीही मेट्रोसाठी या रस्त्याच्या सुधारणा व विकासाकरिता स्मार्ट सिटीकडे काम सुपूर्त केले गेले़ पालिकेने तांत्रिक मांडणी करून आता हा चेंडू निविदा प्रक्रियेकरिता ‘स्मार्ट सिटी’कडे ढकलला असला तरी पुरेसा रस्ता मिळावा, यासाठी स्मार्ट सिटीची यंत्रणाही पालिकेकडेच डोळे लावून आहे़ कारण या रस्त्याकरिता प्रलंबित भूसंपादन करणे, या जागेचा मोबदला म्हणून टीडीआर देणे ही सर्व भूमिका केवळ पालिकाच पार पाडू शकणार आहे़
दरम्यान, हे काम पालिकेकडून होईल, या आशेवर स्मार्ट सिटीने या रस्त्याच्या कामाकरिता ४५ कोटी ८० लाख ९१ हजार ७२५ रुपयांचे टेंडर काढले आहे, तर दुसरीकडे पीएमआरडीएची मेट्रोकरिताची अंमलबजावणी यंत्रणा रस्ता मोजणी करू लागली आहे़ त्यामुळे या सर्वांमधील समन्वयाचा अभाव हा ठळकपणे दिसून येत आहे़
............
मेट्रो मार्गही लागला बदलायला
हिंजवडीहून बाणेरमार्गे येणारी ही मेट्रो पूर्वीच्या नियोजनानुसार, बालेवाडी येथील लक्ष्मीमाता चौक, चाकणकर मळामार्गे बाणेर रस्ता येथील बालेवाडी फाटा चौकात येणार होती़ मात्र लक्ष्मीमाता चौकातील कठीण वळण व या भागातील भूसंपादन अशक्य असल्याने, बालेवाडी क्रीडा संकुलाकडून येणारी ही मेट्रो बालेवाडीतील रामनगरमार्गे हायस्ट्रीटमार्गे सायकर चौकात बाणेर रस्त्याला जोडली गेली़ यामुळे पालिकाही भूसंपादनाचे कष्ट काही अंशी कमी झाल्याने समाधानी आहे़
...............
रस्ता देणे स्मार्ट सिटीसाठी मोठे आव्हान
पुणे विद्यापीठ ते राधा चौक (हायवे) या रस्त्यापैकी सायकर चौक बाणेरपर्यंतचा रस्ता मिळवून देणे हे स्मार्ट सिटी यंत्रणेला मोठे आव्हान आहे़ मेट्रोला आवश्यक असलेला रस्ता सध्या या भागात कुठेच नाही़ बालेवाडी, रामनगर, हाय स्ट्रीट यांसहचा ७० टक्के मार्ग विनासायास उपलब्ध असला तरी, बाणेर, बाणेर गावठाण, सकाळनगर, सिंध सोसायटी येथील रस्ता मेट्रोला उपलब्ध करून देण्याकरिता स्मार्ट सिटीला पालिकेचाच आधार घ्यावा लागणार आहे़, तर रस्त्यालगतच्या राज्य व केंद्र सरकारच्या जागा मिळविण्यासाठीही शासनाची दारे ठोठवावी लागणार आहेत़
.........
रस्ता व मेट्रोची मध्यरेषा जुळणे जरुरी
मेट्रोची लांबी, जागोजागी असलेली वळणे यामुळे वळणाकरिता, मेट्रोकडून या रस्त्यावरील मध्यरेषा स्पष्ट होणे आवश्यक आहे़ यामुळे पालिकेच्या ताब्यातील रस्त्यांच्या रुंदीनुसारची मध्यरेषा व मेट्रोला आवश्यक मध्यरेषा जुळणे महत्त्वाचे आहे व त्यानुसारच पुढील भूसंपादन व नियोजन करणे सोपे जाईल, मात्र सध्या तसे होत नसल्याची कबुली संबंधित यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली़