राज्यात परिचारिकांची साडेतीन हजार पदे रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 12:47 AM2019-05-15T00:47:20+5:302019-05-15T00:47:43+5:30
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील सरकारी रुग्णालयांमध्ये परिचारिकांच्या २५ हजार २७४ मंजूर पदांपैकी ३ हजार ४१० पदे रिक्त आहेत.
पुणे : राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील सरकारी रुग्णालयांमध्ये परिचारिकांच्या २५ हजार २७४ मंजूर पदांपैकी ३ हजार ४१० पदे रिक्त आहेत. पदे भरायचीच नाहीत किंवा भरली तरी ती अकरा महिने करारावर भरायची या शासनाच्या धोरणामुळे आरोग्यसेवेचा कणाच खिळखिळा झाला आहे.
‘इंडियन नर्सिंग कौन्सिलने’ (आयएनसी) शहर आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये किती परिचारिका असल्या पाहिजेत यासंदर्भातील प्रमाण निश्चित केले आहे. त्यानुसार शहरात एका रुग्णामागे तीन, तर ग्रामीण भागात एका रुग्णामागे चार परिचारिका बंधनकारक आहे. मात्र या प्रमाणाकडे दुर्लक्ष करीत सद्यस्थितीत शहरात एका परिचारिकेकडे ५० ते ६० रुग्णांची अथवा संपूर्ण वॉर्डाची जबाबदारी येते. सार्वजनिक आरोग्य सेवा विभागात अधिसेविका वर्ग ३, सहाय्यक अधिसेविका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका/निर्देशिका, शुश्रृषा अधिकारी/ क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, मनोरुग्ण तज्ञ परिचारिका, बालरुग्ण तज्ञ परिचारिका, परिसेविका, अशी अनेक पदे रिक्त आहेत.