विधानसभा निवडणुकीत 'आचारसंहिता भंग' करण्यात पुण्यातील 'हा' मतदारसंघ ठरला 'नंबर वन'!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 11:37 AM2024-11-05T11:37:24+5:302024-11-05T11:38:12+5:30
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पथकाकडून आचारसंहितेचा भंग होतो की नाही, यावर नजर ठेवली जाते.
Pune Election Updates ( Marathi News ) : केंद्रीय निवडणूक आयोगाने नागरिकांना आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या 'सी व्हिजिल' अॅपवर तक्रारींची संख्या वाढू लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या ६१९ तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक २१५ तक्रारी या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून आल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली.
आचारसंहितेचा भंग होण्याचे प्रकार निवडणुकीच्या काळात वाढतात. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पथकाकडून आचारसंहितेचा भंग होतो की नाही, यावर नजर ठेवली जाते. त्यानुसार गुन्हेही दाखल केले जात आहेत. त्याशिवाय 'सी व्हिजिल' अॅपवरही तक्रारींचा ओघ वाढला आहे. 'सी व्हिजिल' अॅपवर गेल्या काही दिवसांमध्ये या तक्रारी वाढल्या आहेत. त्यानुसार, आतापर्यंत ६१९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये वडगाव शेरी मतदारसंघातून सर्वाधिक २१५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर पर्वती मतदारसंघातून १०२, कसबा मतदारसंघातून ७१, पुणे कँटोन्मेंटमधून ३९, हडपसरमधून ३२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील जुन्नर, पुरंदर विधानसभा मतदारसंघातून एकही तक्रार प्राप्त झालेली नाही.
अशी आहे प्रक्रिया
- आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सी- व्हिजिल हे अॅप उपलब्ध करून दिले आहे. यासाठी प्ले स्टोअरवरून 'सी- व्हिजिल' अॅप मोफत डाऊनलोड करता येते.
- अॅपमध्ये छायाचित्र, व्हिडीओ किंवा ऑडिओ तयार करून पोस्ट केल्यानंतर तक्रारीची नोंद होते. तर तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनिटांमध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते.
- भरारी पथकाकडून याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्यावर कार्यवाही करतात. तक्रारीचे स्वरूप व संख्येनुसार वेळ कमी-अधिक होतो.
- तक्रारीचे निरसन झाल्यानंतर तक्रारदाराला अॅपद्वारे संदेश जातो. याशिवाय आचारसंहिता कक्षाकडेही आचारसंहिता भंगाबाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात.