इतकी वर्षे केलेल्या संगीत साधनेचा हा सन्मान; डॉ प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 09:34 PM2022-01-25T21:34:11+5:302022-01-25T21:34:22+5:30
प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या डॉ. प्रभा अत्रे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पदमविभूषण’ जाहीर झाल्याने पुणेकरांसाठी अभिमानाची बाब ठरली
पुणे : इतकी वर्षे जी संगीत साधना केली. त्याचा हा सन्मान आहे. आपण जे काम करतो. ते लोकापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून परत वाहवा मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे, अशी भावना ’स्वरयोगिनी’ डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली.
प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या डॉ. प्रभा अत्रे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पदमविभूषण’ जाहीर झाल्याने पुणेकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. यापूर्वी ’पदमश्री’ आणि ‘पदमभूषण’ हा सन्मान देखील त्यांना मिळाला आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत अशा संगीत प्रकारांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व आहे . भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याच्या कार्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. ’स्वरमयी’, ‘सुस्वराली’, ‘‘स्वरांगिणी’, ‘स्वररंजिनी’ या संशोधनपर संगीतविषयक पुस्तकांसह ‘अंत:स्वर’ या काव्यसंग्रहाचे लेखन त्यांनी केले आहे. पुण्यात 'स्वरमयी गुरुकुल' संस्थेची स्थापना करून त्यांनी त्याद्वारे पारंपरिक गुरु-शिष्य शैलीतील संगीत शिक्षण व समकालीन संगीत शिक्षणाचा मेळ घातला आहे. या संस्थेमार्फत, प्रभा अत्रे फाउंडेशनद्वारा अनेक नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.
‘पदमविभूषण’ जाहीर झाल्यानंतर त्यांच्या त्या अविस्मरणीय मैफलीची रसिकांना आठवण
लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाटमध्ये डॉ. प्रभा अत्रे यांची रंगलेली श्रवणीय मैफल भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त आयोजित ’लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ कार्यक्रमामध्ये गतवर्षी किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी पंडितजींच्या स्मृतींना वंदन करून गानसेवा सादर केली. ’संगीत ऐकणे ही एक पूजा आहे. ती पूजा वेगवेगळ्या त-हेने करावी लागते. संगीत ऐकण्यासाठी संयम आवश्यक असतो, असे सांगत त्यांनी अभिजात गायकीतून मैफलीत सूरांचे अनोखे रंग भरले .कोरोना काळातही डॉ. प्रभा अत्रे यांच्या मैफलीचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. दिवाळी पहाटच्या निमित्ताने त्यांनी पूर्वी रचलेली ‘आज पूरी हो तुम्हारी, आओ मिलकर मनाये दिवाली’ ही रचना सादर करून रसिकांची मने जिंकली. डॉ. प्रभा अत्रे यांना ‘पदमविभूषण’ जाहीर झाल्यानंतर त्यांच्या त्या अविस्मरणीय मैफलीची रसिकांना आठवण झाली.