...ही जातीय नाही तर पक्षनिष्ठेतून झालेली निवड; मेधा कुलकर्णींचा दावा

By राजू इनामदार | Published: February 14, 2024 04:58 PM2024-02-14T16:58:25+5:302024-02-14T17:08:32+5:30

भाजपकडे पुण्यात ब्राह्मण चेहरा नव्हता, त्यामुळे उमेदवारी दिली हा टीकात्मक मुद्दा डॉ. कुलकर्णी यांनी खोडून काढला

This is not a choice of caste but of party loyalty Medha Kulkarni claim | ...ही जातीय नाही तर पक्षनिष्ठेतून झालेली निवड; मेधा कुलकर्णींचा दावा

...ही जातीय नाही तर पक्षनिष्ठेतून झालेली निवड; मेधा कुलकर्णींचा दावा

पुणे: मागील ५ वर्षे जणू राजकीय अज्ञातवासात असलेल्या माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे कोथरूडमधील निवासस्थान बुधवारी सकाळी गर्दीने फुलून गेले. खुद्द डॉ. कुलकर्णी याही सस्मित मुद्रेने कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होत्या. निमित्त होते भारतीय जनता पक्षाने त्यांना जाहीर केलेल्या राज्यसभेच्या उमेदवारीचे.

पक्षाने राज्यसभेच्या उमेदवारांच्या पहिल्याच यादीत राज्यातील पहिल्या तिघांच्या यादीत त्यांचे नाव जाहीर केले. भाजपच्या विधानसभेतील आमदारांची संख्या लक्षात घेता, डॉ. कुलकर्णी आता निवडून आल्यातच जमा आहेत. त्यामुळे निवडणूक होण्यापूर्वीच त्यांचे निवासस्थान पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या गर्दीने ओसंडून वहात होते. सिटिंग आमदार असताना पक्षाने ५ वर्षांपूर्वी त्यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली. त्यातून आलेली नाराजी न लपवता डॉ. कुलकर्णी पक्षाबरोबरच राहिल्या. त्यामुळेच की काय पक्षाने त्यांच्यावरचा अन्याय दूर करून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले अशी चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजपकडे पुण्यात ब्राह्मण चेहरा नव्हता, त्यामुळे उमेदवारी दिली हा टीकात्मक मुद्दा डॉ. कुलकर्णी यांनी खोडून काढला. ही निवड जातीय दृष्टिकोनातून नाही तर पक्षनिष्ठा, कामाची दखल यातून झाली आहे असा दावा त्यांनी केला. पक्षाचे काम निष्ठेने करत राहिले. पक्षाने उमेदवारी नाकारली तरीही महिला आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देत कामावर विश्वास दाखवला. ते काम करत राहिले, त्यामुळेच ही उमेदवारी मिळाली. भाजपच्या कोणत्याही पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी पक्षनिष्ठा हा पहिला नियम असतो, त्याचे पालन केल्यामुळेच पक्षाने हा विश्वास दाखवला आहे, आता या संधीचेही सोने करू असे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.

सन २०१९ च्या निवडणूकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले गिरीश बापट यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. त्याआधी कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्याच आमदार माजी महापौर मुक्ता टिळक यांचे निधन झाले. ब्राह्मण समाजातील दोन जणांचे असे अचानक निधन झाल्यानंतर पक्षाकडे पुण्यातील ब्राह्मणी चेहराच राहिला नव्हता. त्यातच कसबा विधानसभेच्या पोटनिवडणूकीत पक्षाने ब्राह्मण उमेदवार दिला नाही, त्यामुळे तिथे पराभव झाला, आता ती कसर भरून काढली असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

स्थानिक स्वपक्षीय विरोधकही घायाळ

नगरसेवक, आमदार व आता खासदार असा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांच्या नावाची चर्चा राज्यसभेसाठी नाही तर लोकसभा किंवा पुढे विधानसभेच्या उमेदवार म्हणून होत होती. मात्र धक्कादायक निर्णय घेण्याच्या भाजप पक्षश्रेष्ठींच्या पद्धतीनुसार त्यांच्या गळ्यात पक्षाने अचानक राज्यसभेच्या उमेदवारीची माळ टाकली. त्यांचे कोथरूड विधानसभेतील स्वपक्षीय विरोधकही यामुळे घायाळ झाल्याची चर्चा आहे.

Web Title: This is not a choice of caste but of party loyalty Medha Kulkarni claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.