"भाजपकडून स्वतःच्या फायद्यासाठी ही प्रक्रिया रद्द", प्रभाग रचना बदलाविरोधात राष्ट्रवादी जाणार न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 09:59 IST2022-08-05T09:59:36+5:302022-08-05T09:59:43+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार

"भाजपकडून स्वतःच्या फायद्यासाठी ही प्रक्रिया रद्द", प्रभाग रचना बदलाविरोधात राष्ट्रवादी जाणार न्यायालयात
पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार केलेली तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द करून बुधवारी नव्याने चार सदस्यीय प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना अंतिम हाेऊन सुमारे ८० टक्के निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असताना भाजपने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी ही प्रक्रिया रद्द केली. नव्याने चार सदस्यीय प्रभागाचा निर्णय घेतला. महापालिकेत आधीच सहा महिने प्रशासक असताना, नव्याने चार सदस्यीय प्रभाग रचना करून निवडणूक प्रक्रियेत अधिक वेळ घालवला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत होती. राज्य सरकारने यात बदल करून एकप्रकारे न्यायालयाचा अवमान केला आहे. सरकारचा हा निर्णय रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल’’, असेही जगताप म्हणाले.