यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार; उष्णतेची लाट येण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
By श्रीकिशन काळे | Published: March 1, 2024 06:13 PM2024-03-01T18:13:01+5:302024-03-01T18:17:32+5:30
महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भागांमध्ये मार्च महिन्यात होणाऱ्या पावसाचे प्रमाण देखील सरासरीपेक्षा अधिक राहणार
पुणे: गेल्या वर्षी हवामान बदलाचा फटका भारताला चांगला बसला आहे. त्यात यंदा देखील भर पडणार आहे. यावर्षीचा उन्हाळा अधिक तापदायक राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीने आज देण्यात आला. मार्च ते मे महिन्यातील हवामान कसे असेल, याची माहिती ‘आयएमडी’ने जारी केली आहे.
दरवर्षी मार्च महिना सुरू झाला की, ‘आयएमडी’ आपला तीन महिन्यांच्या हवामानाचा अंदाज जारी करते. यावर्षी देशातील बहुतांश भागातील सरासरी तापमान अधिक राहणार असून, केवळ उत्तर-पश्चिम, उत्तर-पूर्व भागात सरासरी तापमान असणार आहे. हिमालयातील तापमान नेहमीप्रमाणे असेल. मार्च ते मे २०२४ या उन्हाळ्याच्या हंगामात महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रात देखील अधिक तापमान असेल आणि उष्णतेची लाट येईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
महाराष्ट्रातही मार्चमध्ये अधिक पाऊस
महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भागांमध्ये मार्च महिन्यात होणाऱ्या पावसाचे प्रमाण देखील सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. देशातील मार्च महिन्यातील पावसाचा ‘लॉग पिरियड ॲव्हरेज’ म्हणजे एलपीए हा साधारणपणे २९.९ मिमी राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही आकडेवारी १९७१ ते २०२० च्या एकूण नोंदीवरून काढण्यात आली आहे.