... यामुळे देवेंद्र फडणवीसांची विश्वासार्हता कमी झाली; अजित पवारांनी २०१४ पासूनचा 'हिशेब' मांडला!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 02:19 PM2023-02-04T14:19:12+5:302023-02-04T14:27:20+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुम्ही कसे पाहता, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता.
पुणे/मुंबई - राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मैत्री महाराष्ट्राला माहिती आहे. पहाटेच्या शपथविधीमुळे या दोन्ही नेत्यांमधील जवळीक अनेकदा चर्चेत असते. त्यावरुन, अजित पवार यांनी राज्यात २०१४ नंतर बदलेल्या भाजपच्या राजकारणावर भाष्य केलं. यावेळी, देवेंद्र फडणवीस याचं पुढे आलेलं राजकारण, भाजपच्या वरिष्ठांना पाठिमागे सारत पुढे जात असलेल्या अजेंड्यावर बोट ठेवला. तसेच, फडणवीसांच्या विश्वासर्हतेवरही भाष्य केलं. ‘लोकमत’च्या वतीने आयोजित पिंपरी-चिंचवड अचिव्हर्स अवॉर्ड वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पवार उपस्थित होते. त्या वेळी ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी राज्यातील सत्तांतर, विधान परिषदेचे निकाल व पोटनिवडणूक याविषयी पवारांनी दिलखुलास संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुम्ही कसे पाहता, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी २०१४ पासून ते सध्याच्या सुरु असलेल्या भाजपमधील राजकारणाचा संदर्भ दिला. भाजपमध्ये अनेक नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते, पण भाजपात वरिष्ठांचा आदेश अंतिम असतो. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींचा चेहरा समोर करुन भाजपने निवडणूक लढली आणि स्पष्ट बहुमत घेत जिंकली. त्यानंतर, मोदींनीच देवेंद्रजींना पुढे केलं, त्यामुळे बाकीचे नेते मंत्रिमंडळात काम करायला लागले. एकनाथराव खडसे हेही देवेंद्रजींच्या पाठीमागे गेले. पण, एकेकाळी भाजप हा शेठजी, भठजींचा पक्ष असल्याचं अनेकजण म्हणतात. मात्र, बहुजन समाजापर्यंत, भाजपची पाळमूळ गावपातळीवर नेण्याचं काम गोपीनाथ मुंडे, एकनाथराव खडसे, अण्णा डांगे, भाऊसाहेब धुलकर, ना.स.फरांदेंनी केलं. दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे आपल्याला सोडून गेले. पण, भाजपची सत्ता आल्यानंतर मूळ मुख्यमंत्रीपदाचा दावा गोपीनाथ मुंडेंचा होता, असे अजित पवार यांनी म्हटलं.
भाजपमध्ये गेल्या ८ वर्षांच्या कालावधीत वरिष्ठ नेत्यांना मागे सारण्यात आलं. त्यातून. २०१४ ते २०१९ या कालावधीतील भाजपमधील अंतर्गत घडामोडींमुळे देवेंद्रजींची विश्वासर्हता कमी झाली, असे अजित पवार यांनी म्हटले. आपल्याला आपलेच मुख्यमंत्री दाबतायंत का, साईडट्रॅक करतायंत का, अशी भावना त्यांच्या जवळच्याच लोकांमध्ये निर्माण झाली. देवेंद्रजींना तसं केलंही नसेल, पण जी काही परिस्थिती निर्माण झाली, ती पाहता तसी भावना भाजप नेत्यांमध्ये होती, असे अजित पवार यांनी म्हटले. तसेच, आजही काहींना एमएलसी केलं जातं, दुसऱ्यांना राज्यसभेवर घेऊन मंत्री केलं जातं. पण, काहींना सोपस्कर बाजुला ठेवलं जातं, असे म्हणत अजित पवारांनी नाव न घेता पंकजा मुंडेंवर होत असलेल्या
ही राष्ट्रवादीची मोठी चूक होती
काँग्रेस आघाडीत २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी मोठा पक्ष असतानाही मुख्यमंत्रिपद मिळविता आले नाही. ही पक्षातील वरिष्ठांची सर्वांत मोठी चूक होती, अशी कबुली विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात शुक्रवारी दिली. त्यावेळी आमच्या वरिष्ठांपैकी कोणालाही मुख्यमंत्री केले असते तरी चालले असते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
वंचित ‘मविआ’त आल्यास विजय
वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेशी युती केली आहे, त्यांचे काय? असे विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे. वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी त्यांच्या काही उमेदवारांनी लाखभर मते घेतली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत वंचित आले तर महाराष्ट्रामध्ये वेगळे चित्र निर्माण होईल. ‘मविआ’सोबत वंचितने यावे, असे माझे वैयक्तिक मत आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
...म्हणून आमचे सरकार पडले
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत काय बिनसले होते, या प्रश्नावर पवार म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांना आमदारकीचा आणि मंत्रिमंडळाचा अजिबात अनुभव नव्हता. ते दिल्लीत पंतप्रधानाच्या कार्यालयातील काम बघायचे. पण, दिल्ली आणि राज्यातील राजकारणात खूप अंतर असते. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असताना दुर्दैवाने काही असे प्रसंग निर्माण झाले, आम्ही एकमेकांना साथ देण्याऐवजी काहींना आमचे विरोधक जवळचे वाटले. त्याचा फटका बसून नंतर सरकार पडले, असा गौप्यस्फोटही अजित पवार यांनी केला.