Manoj Jarange Patil: महाराष्ट्रातला हा पहिला उठाव असणार, सर्वसामान्य सत्तेत येणार, जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 01:39 PM2024-08-12T13:39:08+5:302024-08-12T13:39:21+5:30
आम्ही विधानसभेला सगळ्या जागा लढवून सगळ्यांना निवडून आणू, गेल्या ७५ वर्षात हे पहिल्यांदा घडेल
पुणे : महाराष्ट्र्र सरकारने जर आरक्षण नाही दिले तर सगळ्या जागा आम्ही लढवणार आहोत. राखीव मराठे तर सगळे लढवणार. बाकीच्या जागेंवर सगळ्या जातीधर्माचे लोक आम्ही देणार आहोत. आम्ही सगळ्यांना निवडून आणू. हा महाराष्ट्रातला पहिला उठाव असेल. सर्वसामान्य लोक सत्तेत गेले हे ७५ वर्षात पहिल्यांदा घडणार. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) राज्य सरकारला दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जरांगे पाटील राज्यात शांतता रॅली काढत आहेत. ही रॅली काल पुण्यात दाखल झाली होती. रॅलीचे जल्लोषात स्वागत कात्रज येथे करण्यात आले. त्यानंतर ही रॅली स्वारगेटमार्गे सारसबागेसमोर आली आणि तिथून डेक्कन येथे रॅलीचा समारोप झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला. काल रात्री तब्बेतीच्या कारणास्तव पुण्यातच थांबले होते. आज सकाळी पुन्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जरांगे पाटील म्हणाले, आता बीपी पण कमी आहे. आज रात्री उपचार घेणार आहे. सध्या तब्बेत बरी आहे. पाच सहा दिवस उपचार घेण्यास सांगितले आहे. पण दौरे असल्याने मी सगळ्या कार्यक्रमाला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजात आरक्षणाबाबत पाटील म्हणाले, आरक्षणाबाबत सामान्य ओबीसी आणि मराठा सगळे एकत्र आहेत. त्यांना आरक्षण असून ते लढत आहेत. आम्हाला नाही तर आम्ही किती लढायला पाहिजे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा हे जातीवादी नाहीत कुणबी आणि मराठा हे एकच आहेत दोघांनाही आरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) जरांगे पाटलांना विधानसभेत उमेदवार उभे करून निवडून आणून दाखवा असा इशारा दिलाय याबाबत विचारले असता जरांगे पाटील म्हणाले, भुजबळ यांना महत्व देत नाही. आता फक्त ओबीसी आणि मराठ्यांचं वाटुळ करू नको, भांडण लावू नको किती निवडून आणायचं हे आता मी बघतो. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मराठ्यांत फूट दाखवतात. देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न कधी पूर्ण होऊ शकणार नाही, मराठ्यांत कधीही फूट पडणार नाही. विधानसभेसाठी तयारी केलीच आहे. तुम्ही मुख्यमंत्री होणार का? असे विचारले असता ते म्हणाले, मी मुख्यमंत्री व्हावं अशा समाजाच्या भावना आहेत. त्यांचा मी आदर करतो. पण मला समाजाला मोठं करायचं आहे. मी स्वतः मुख्यमंत्री होऊन मोठं होणार नाही. आमच्या सर्व आमच्या मागण्या मान्य करा. जर २९ ऑगस्टपर्यंत हे नाही केले तर आमचा निर्णय ठरला. आम्ही पाडायचे की, उभे करायचे ते ठरवू. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.