...हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही" मारहाण झालेल्या तरुणाची मोहोळ यांनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:19 IST2025-02-22T13:18:34+5:302025-02-22T13:19:40+5:30

मोहोळ यांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्या आहेत

This will never be tolerated murlidhar mohol met the beaten youth | ...हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही" मारहाण झालेल्या तरुणाची मोहोळ यांनी घेतली भेट

...हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही" मारहाण झालेल्या तरुणाची मोहोळ यांनी घेतली भेट

पुणे: भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला मारहाणीच्या घडलेल्या प्रकारानंतर त्याच्या निवासस्थानी खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सपत्नीक जाऊन भेट घेतली. यावेळी कोणाच्याही हकनाक वाट्याला न जाणाऱ्या देवेंद्रसारख्या तरुणाला मारहाण होते, हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही असा इशारा मोहोळ यांनी दिला आहे. तसेच योग्य ती पावले उचलण्याबाबतही पोलीस आयुक्तांना सूचना केल्या आहेत

मोहोळ म्हणाले, तीन दिवस गुजरात आणि दिल्लीमध्ये असल्याने पुण्यात पोहोचल्यावर थेट देवेंद्रच्या घरी पोहोचलो. देवेंद्रकडून सगळा घटनाक्रम समजून घेत त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत देवेंद्रला जबर दुखापत झाली असून आरोपींनाही अटक झाली आहे. तसेच आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्या आहेत. देवेंद्र एक कर्तबगार संगणक अभियंता असून अतिशय मितभाषी आणि शांत स्वभावाचा तरुण असल्याचे मोहोळ यावेळी म्हणाले आहेत. 

सुशिक्षित तरुणाला विनाकारण मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्यांना सोडू नका. एवढेच काय, तर त्यांना वाचविण्यासाठी येणाऱ्यांविराेधातदेखील कडक कारवाई करावी, असे आदेशही माेहाेळ यांनी दिले आहेत. सोशल मीडियावर अनेकांचे रिल्स, फोटो व्हायरल होत असताना पुणे पोलिस डोळे झाकून बसलेत का? याबाबत पोलिसांनी आत्मपरीक्षण करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली

बुधवारी (१९ फेब्रुवारी) सायंकाळी साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास कोथरूडमधील भेलकेनगर चौकात ही घटना घडली. या मारहाणीत तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय ३५, शिंदे चाळ, संजय चौक, शास्त्रीनगर, कोथरूड), किरण कोंडिबा पडवळ ( वय ३१ , शेख चाळ, शास्त्रीनगर, कोथरूड) आणि अमोल विनायक तापकीर (वय ३५, रा. लालबहाद्दूर शास्त्री कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड) अशी त्यांची नावे आहेत.

आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांची जनमानसात व समाजामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे दहशत असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध साक्षीदार होण्यास अगर तक्रार देण्यास नागरिक समोर येत नसल्याने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी यांनी न्यायालयात केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एच. वानखेडे यांनी कोथरूडमध्ये भरदिवसा तरुणाला मारहाण करणाऱ्या एका टोळीशी संबंधित तीन आरोपींना दि. २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याचे कलम वाढविण्यात आले आहे.

Web Title: This will never be tolerated murlidhar mohol met the beaten youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.