'हे महाराष्ट्राला शोभणार नाही...' सत्तारांच्या वक्तव्यावरून महिला आयोगाकडून कारवाईच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 07:00 PM2022-11-07T19:00:34+5:302022-11-07T19:17:25+5:30
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया यांच्यावर टीका करताना अतिशय गलिच्छ वक्तव्य केलं
धायरी : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया यांच्यावर टीका करताना अतिशय गलिच्छ वक्तव्य केलं आहे . त्यांच्या टीकेनंतर राज्यभरातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्तारांच्या गलिच्छ टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. सत्तारांनी माफी मागावी, अशी मागणी केली जातेय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. या सगळ्या घडामोडींवर महिला आयोगाकडे एकाने तक्रार केली असून याबाबत कारवाईच्या सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत. तशा पद्धतीचे पत्रही त्यांनी दिले आहे.
सुप्रिया सुळे यांच्यासारख्या दिग्गज खासदारावर अशा प्रकारची टीका होणं महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारं नाही, अशी भूमिका अनेक सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जातेय. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्गार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली असून याप्रकरणी राज्याचे पोलिस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे महिला आयोगाकडून सांगण्यात आले आहे.