Pune Cold: पुण्यात यंदाचे निचांकी तापमान ७.४; राज्यही गारठले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 01:29 PM2023-01-11T13:29:29+5:302023-01-11T13:29:40+5:30
राज्यात बहुतांश शहरांमध्ये सरासरी किमान तापमानात २ ते ५ अंशांची घसरण
पुणे : स्वच्छ आकाश तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्य गारठले असून थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदाचे निचांकी तापमान ७.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. राज्यात बहुतांश शहरांमध्ये सरासरी किमान तापमानात २ ते ५ अंशांची घसरण झाली आहे.
पुढील तीन दिवस किमान तापमान काहीसे वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर थंडीत पुन्हा वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पुणेकरांना हुडहुडी भरली आहे. पहाटे आणि सकाळीही बोचरे वारे वाहत आहेत. त्यामुळे गरम कपडे घातल्याशिवाय नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. पुढील तीन दिवसांत थंडीची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. किमान तापमान १० अंशांपेक्षा कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.