Maharashtra Kesari: यंदा 'महाराष्ट्र केसरी' पुण्यात रंगणार; राज्यभरातून स्पर्धेत ९०० मल्ल भिडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 03:51 PM2022-12-21T15:51:57+5:302022-12-21T15:52:13+5:30
पारितोषिक वितरणाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : १०-१४ जानेवारीदरम्यान स्पर्धा
पुणे : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचा थरार १० ते १४ जानेवारी २०२३ या कालावधीत पुण्यात रंगणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातून ४७ तालीम संघांतील ९०० मल्ल सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस व 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, किनारा हॉटेलजवळ, कोथरूड, पुणे येथे स्पर्धेचा थरार अनुभवता येणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीचे चेअरमन संजयकुमार सिंह, माजी खासदार अशोक मोहोळ, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके, पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे उपस्थित होते.
खासदार रामदास तडस म्हणाले, महाराष्ट्र केसरीचे हे ६५ वे वर्ष आहे. या स्पर्धेत खेळण्याचे प्रत्येक मल्लाचे स्वप्न असते. वर्षभर त्यासाठी मल्ल तयारी करतात. यंदा ही स्पर्धा भव्य स्वरूपात होणार असून, सलग पाच दिवस स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेत नामांकीत ४० मल्ल सहभागी होणार आहेत."
मुरलीधर मोहोळ म्हणाले, "स्पर्धेचे उद्घाटन १० जानेवारीला होणार आहे. उद्घाटनाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, योगेश्वर दत्त व साक्षी मलिक यांची उपस्थित राहणार आहेत. बक्षीस वितरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा विविध दहा वजनीगटात, माती आणि गादी विभागात होतील. त्यात ९० व्यवस्थापक, ९० मार्गदर्शक, १२५ तांत्रिक अधिकारी, ९० पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
पत्रकार परिषद गुंडाळली
राज्य कुस्तीगीर परिषदेवर कारवाई झालेली असताना स्पर्धेचे आयोजन करण्याचा अधिकार अस्थायी समितीला कसा? असा प्रश्न विचारला असता संयोजकांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. कुस्तीगीर परिषदेवर कारवाई केल्याने कुस्तीगीर महासंघाच्या परवानगीने अस्थायी समितीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले तसेच, नगर येथे आयोजित केलेली ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यात आयोजित ‘महाराष्ट्र केसरी’ला हरकत नसल्याचे पत्र दाखवा असा आग्रह पत्रकारांनी केल्यावर तसे पत्र आम्ही देऊ, असे सांगत मोहोळ यांनी पत्रकार परिषद गुंडाळली.