Pune: यंदा दुधाला लागले चंद्राचे ग्रहण; कोजागरी पौर्णिमालाच चंद्रग्रहण आल्याचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 11:23 AM2023-10-28T11:23:34+5:302023-10-28T11:24:13+5:30
नेहमीच्या काेजागरीच्या तुलनेत यावर्षी २५ टक्के मागणीत घट झाल्याचे दूध उत्पादक संघांनी सांगितले....
पुणे : शहरासह उपनगरात मोठ्या उत्साहात कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. यावर्षी शनिवारी (दि. २८) ही काेजागरी पौर्णिमा आहे. मात्र, त्याच रात्री खंडग्रास चंद्रग्रहणदेखील आहे. त्यामुळे ग्रहण काळात अनेक जण काही खात नाहीत. याचा परिणाम दुधाच्या मागणीवर झाला असून, नेहमीच्या काेजागरीच्या तुलनेत यावर्षी २५ टक्के मागणीत घट झाल्याचे दूध उत्पादक संघांनी सांगितले.
दरवर्षी प्रथेप्रमाणे काेजागरी पाैर्णिमेच्या रात्री घोटलेले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते आणि मध्यरात्री १२ वाजता ते प्राशन केले जाते. तसेच या रात्री शहरात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. एरव्ही दरराेज शहरात सात ते आठ लाख लिटर दूध संपते; पण काेजागरीला यात वाढ हाेऊन ती मागणी १० लाख लिटरपर्यंत वाढते. यंदा काेजागरीलाच चंद्रग्रहण असल्याने रात्री १२ वाजता दूध प्राशन करता येईल का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परिणामी, दुधाची मागणी २५ टक्क्यांनी घटली असल्याचे सांगण्यात येते.
ग्रहण वेध काळात कोजागरीचे दूध प्राशन करू नये. ग्रहण लागण्यापूर्वी पूजा, दुधाचा नैवेद्य करता येईल. प्रसाद म्हणून पळीभर दूध घ्यावे. बाकी दूध दुसऱ्या दिवशी प्राशन करावे, असे पंचांगकर्ते सांगत आहेत. त्यामुळे यंदा कोजागरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दूध प्राशन करण्याचा सल्ला ज्योतिषी देत आहेत. त्यामुळे यंदा दुधाच्या खरेदीवर परिणाम होणार असल्याने दूध मागणी घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महिला वर्ग आणि परंपरा जपणारे नागरिक यंदा ग्रहण लागणार असल्याने या काळात काही खाणार नाहीत. काहींनी दूधही पिणार नसल्याने यंदा दूध मागणीत २५ टक्के घट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
- गोपाळ म्हस्के, अध्यक्ष, राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ