यंदा राज्यात ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोबरलाच सुरू करणार
By नितीन चौधरी | Published: August 29, 2022 06:06 PM2022-08-29T18:06:08+5:302022-08-29T18:06:36+5:30
सहकारमंत्री अतुल सावे यांनी सोमवारी साखर आयुक्तालयाचा आढावा घेतला
पुणे : राज्यात गेल्या हंगामात ऊस गाळप उशिरापर्यंत चालले. त्यातही मराठवाड्यात हा प्रश्न गंभीर बनला. त्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी यंदा ऊस गाळप हंगाम अर्थात साखर हंगाम १ ऑक्टोबरलाच सुरू करणार आहोत. त्यासाठी साखर आयुक्तालयाने तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली.
सावे यांनी सोमवारी साखर आयुक्तालयाचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित होते. सावे म्हणाले, “साखर उत्पादनात राज्य देशात आघाडीवर आहे. यंदाही गेल्या वर्षी इतकाच ऊस गाळपाला येणाची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या वर्षीची समस्या येऊ नये यासाठी साखर हंगाम नेहमीच्या तारखेपेक्षा १५ दिवस आधी सुरू करण्याबाबत येत्या १५ सप्टेंबरपर्यंत मंत्रीगटाची बैठक घेण्यात येईल. त्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा निर्णय अंतिम करण्यात येईल. साखर आयुक्तालयानेही याबाबतची तयारी पूर्ण केली आहे.”
या निर्णयामुळे सर्व ऊस गाप होईल याकडे लक्ष दिले जाईल. त्यामुळे समस्या निर्माण होणार नाहीत. ऊसतोड कामगारांबाबतच्या समस्या जाणून घेऊन हार्वेस्टरने ऊसतोड करता येईल का याचीही चाचपणी करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.