यंदा 'महाराष्ट्र केसरी'च्या विजेत्यास मिळणार 'थार', उपविजेत्यालाही मोठं बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 10:28 AM2023-01-10T10:28:58+5:302023-01-10T10:31:46+5:30
'महाराष्ट्र केसरी' च्या विजेत्याला महिंद्रा थार जीप व ५ लाखांचे बक्षीस, तर उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
पुणे - महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार 10 ते 14 जानेवारी 2023 म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. पुण्यातील कोथरुड येथे यंदा स्पर्धेचे 65 वे वर्ष साजरे होत आहे. सलग पाच दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. राज्यभरातील मल्ल एकमेकांशी भिडणार आहेत. 47 तालीम संघातील 900 मल्ल या स्पर्धेत सहभागी होतील. यासह नामांकित 40 मल्लही सहभागी होणार आहेत. यंदाच्या स्पर्धेचं आकर्षण म्हणजे 'महाराष्ट्र केसरी' च्या विजेत्याला महिंद्रा थार जीप व ५ लाखांचे बक्षीस, तर उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१०) सायंकाळी ६ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती 'महाराष्ट्र केसरी'चे प्रमुख संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ६५ व्या 'महाराष्ट्र केसरी'च्या तयारीचा आढावा व भव्य मैदानाची पाहणी केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून 'महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरु झाली. यंदाच्या ६५ व्या 'महाराष्ट्र केसरी' चे संयोजन करण्याची जबाबदारी मोहोळ कुटुंबियांकडे आली. ही आनंदाची व गौरवाची बाब आहे. 'महाराष्ट्र केसरी'ची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या मामासाहेब मोहोळ यांच्या कर्तृत्वाला शोभेल अशा स्वरूपाची ही स्पर्धा होणार आहे. असेही मोहोळ यांनी सांगितले.
'महाराष्ट्र केसरी'स मिळणार 'थार' !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 9, 2023
धन्यवाद, भुजबळ परिवार, कोथरुड !
महाराष्ट्र केसरी विजेत्यास बक्षीसरुपात थार भेट दिली जाणार असून वस्ताद कै. दामोदर विठोबा भुजबळ यांच्या स्मरणार्थ कोथरुड येथील भुजबळ परिवाराच्या वतीनं ही बक्षिसरूपी थार देण्यात येत आहे.#संस्कृती#पुणेpic.twitter.com/01beDMC35T
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समारोप व बक्षीस वितरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग उपस्थित राहणार आहेत. विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात कुस्ती होणार आहे. 900 कुस्तीगीर, 90 व्यवस्थापक, 90 मार्गदर्शक, 125 तांत्रिक अधिकारी, 90 पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
कुस्तीप्रेमींच्या मेळ्यासाठी पुण्य नगरी सज्ज झाली आहे. भव्य ३२ एकर जागेत ही क्रीडानगरी साकारली असून, त्यात १२ एकरमध्ये ८० हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती व तीन गादीचे आखाडे आहेत. पत्रकार यांच्यासाठी स्वतंत्र प्रेक्षागॅलरी उभारण्यात आल्या आहेत. २० एकर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा व्यवस्थेचे चोख नियोजन केले आहे. तसेच, एका कार्डियाक ऍम्ब्युलन्ससह चार ऍम्ब्युलन्स, डॉक्टरांची टीम, १००० पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार
15 प्रत्येक वजनी गटातील विजेत्यांना
'येजडी जावा' ही मोटारसायकल व रोख बक्षीस दिले जाणार आहे. उपविजेत्यानाही बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी उपांत्य व अंतिम लढतीची चुरस पाहायला मिळणार आहे.