तुळशी विवाहानंतर 'इतक्या’ दिवसांनी वाजणार सनई-चौघडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 12:15 PM2022-11-02T12:15:58+5:302022-11-02T12:17:43+5:30
शास्त्राप्रमाणे यंदा ५८ विवाह मुहूर्त....
पिंपरी : दीपोत्सवाने दीपावलीचा आनंद सर्वत्र साजरा झाला आणि व कार्तिक पौर्णिमेला समृद्धी, संपन्नतेचा सोहळा असलेल्या दीपावलीचा समारोप होणार आहे. ५ नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल द्वादशी असून, याच दिवसापासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत अर्थात ८ नोव्हेंबरपर्यंत तुळशीविवाह साजरा करण्यात येणार आहे. ५ नोव्हेंबरलाच चातुर्माससमाप्ती, शनिप्रदोष शाकव्रतसमाप्ती असल्याने या दिवसापासून विवाहसोहळे, मौजीबंधनाचे सनई-चौघडे वाजण्यास प्रारंभ होणार असल्याची माहिती ज्योतिषाचार्य खंडू जोशी यांनी दिली.
भारतीय पंचांगानुसार आणि तत्कालीन पर्यावरणीय वर्तनानुसार पावसाळा आटोपल्यानंतर सोयीनुसार म्हणून वैवाहिक सोहळे साजरे करण्यात येत असतात. त्यानुसार वैदिक परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून (देवशयनी) ते कार्तिक शुल्क एकादशीपर्यंत (देवउठनी) चातुर्मास पाळला जातो.
यंदा देवउठनी एकादशी ४ नोव्हेंबरला येत असून द्वादशीला भगवान विष्णूचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी तुळशीचा विवाह लावण्यात येतो आणि तेव्हापासून वैवाहिक मुहूर्त काढले जाण्याची परंपरा आहे.
शास्त्राप्रमाणे यंदा ५८ विवाह मुहूर्त
चातुर्माससमाप्ती ते चातुर्मासप्रारंभापर्यंत अर्थात २५ नोव्हेंबर २०२२ ते २८ जून २०२३ या काळात शास्त्रानुसार एकूण ५८विवाह मुहूर्त येत आहेत. एप्रिल २०२३ मध्ये गुरूचा अस्त असल्यामुळे, फक्त रविवार ३० एप्रिल रोजी विवाह मुहूर्त आहे. २०२३ मध्ये २९ जूनपासून चातुर्मास सुरू होत आहे.
महिना आणि विवाहाच्या तारखा
नोव्हेंबर : २५, २६,२८,२९
डिसेंबर : २,४,८,९,१४,१६,१७,१८,१९
जानेवारी : १८,२६,२७,३१
फेब्रुवारी : ६,७,१०,११,१४,१६,२३,२४,२७,२८
मार्च : ९,१३,१७,१८
एप्रिल : ३०
मे : २,३,४,७,९,१०,११,१२,१५,१६,२१,२२,२९,३०
जून : १,४,७,८,११,१२,१३,१४,२३,२६,२७,२८