Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: यंदाचे ९७ वे साहित्य संमेलन अमळनेरला निश्चित
By श्रीकिशन काळे | Published: April 23, 2023 02:42 PM2023-04-23T14:42:33+5:302023-04-23T14:46:13+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा झाल्यानंतर लगेच अध्यक्षपदाच्या दावेदाराची चर्चा सुरू
पुणे : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ आज (२३) निश्चित करण्यात आले असून ते अमळनेर येथे होणार आहे. यंदासाठी चार ठिकाणांहून प्रस्ताव आले होते. अंमळनेरचा (जळगाव) प्रस्ताव गेली चार-पाच वर्षांपासून येत होता. त्यामुळे त्यांना यंदा संधी देण्यात आली आहे.
पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक झाली. त्यात अमळनेरवर शिक्कामोर्तब करण्यात आला. संमेलनासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औदुंबर (जि. सांगली) या दोन ठिकाणांच्या प्रस्तावावर अधिक लक्ष होते. तसेच मराठवाड्यातून जालना जिल्ह्यातील प्रस्ताव संमेलनस्थळाच्या यजमानपदासाठी आला होता.
बैठकीमध्ये महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये सर्व पाहणी अहवालांवर चर्चा करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थळ निवड समितीने बैठकीपूर्वी सर्व चारही स्थळांना भेटी दिल्या होत्या.
मराठवाड्यातील उदगीर तालुक्यात गेल्यावर्षी ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्यामुळे लगेच मराठवाड्याला यजमानपद मिळण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषद शाहुपुरी शाखा (सातारा), औदुंबर साहित्य मंडळ (सांगली) आणि मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर (जळगाव) ही तीन स्थळे स्पर्धेमध्ये होती.
अध्यक्षपदाची चर्चाही सुरू होणार
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा झाल्यानंतर लगेच अध्यक्षपदाच्या दावेदाराची चर्चा सुरू होणार आहे.