यंदाची वारी महिलांसाठी 'आरोग्याची वारी', महिला वारकऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार- रुपाली चाकणकर
By राजू इनामदार | Published: June 6, 2023 04:59 PM2023-06-06T16:59:47+5:302023-06-06T17:02:52+5:30
पुणे : आषाढी वारीसमवेत यंदाही राज्य महिला आयोगाची आरोग्य व महिला सुरक्षा वारी असेल. वारीतील महिलांच्या आरोग्याची तसेच सुरक्षेची ...
पुणे : आषाढी वारीसमवेत यंदाही राज्य महिला आयोगाची आरोग्य व महिला सुरक्षा वारी असेल. वारीतील महिलांच्या आरोग्याची तसेच सुरक्षेची काळजी या वारीतील वेगवेगळी पथके घेतील. १० जूनला (शनिवार) निवडुंगा विठोबा मंदिरात सकाळी १० वाजता या वारीला प्रारंभ होईल. त्यानंतर पुढे थेट पंढरपूरपर्यंत वारीबरोबरच ही वारीही चालत असेल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली.
वारी मार्गावरील पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांच्या प्रशासनाचे आरोग्य व महिला वारकरी सुरक्षा वारीसाठी साह्य मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. चाकणकर म्हणाल्या, लाखो महिला या वारीत असतात. अनेक अडचणी सहन करून त्या वारी पूर्ण करतात. त्यांचे प्रश्न, अडचणी सुटाव्यात, त्यांना वारी सुसह्य व्हावी हा या वेगळ्या वारीचा उद्देश आहे. मागील वर्षी ही वारी यशस्वी झाली, त्यामुळे यंदाही आयोगाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
पालखी मार्ग, मुक्काम, विसावा येथे कार्डिओ आणि अँम्ब्युलन्स, गावातील महिला बचत गट, आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत औषधे उपलब्ध करून देण्यात येतील. सँनिटरी नँपकीन, त्याचे विघटन याचे नियोजन, करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, संपुर्ण पालखी मार्गावर महिलांसाठी १४०० तात्पुरती शौचालये व्यवस्था करण्यात आली असून तिथे पाणी, लाईट, महिला समन्वयक यांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्नानगृहाची व्यवस्था, कपडे बदलासाठी आडोसा स्थानिर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करण्यात येत आहे. संपुर्ण मार्गावर, राहायच्या ठिकाणी स्वच्छ प्रकाश असेल यासाठी ५ दिवस आधीपासूनच लाईटची व्यवस्था करण्यात येत आहे.
पुणे, सातारा व सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांमधील जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते यांची यासाठी मदत झाली आहे अशी माहिती चाकणकर यांनी दिली. संपूर्ण वारी महिलांसाठी विनासमस्या व्हावी याची काळजी आयोगाच्या वतीने घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. पुण्यातील १० जूनच्या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र धंगेकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.