थोरले पवार, धाकटे ठाकरे एकत्र
By Admin | Published: April 22, 2016 01:25 AM2016-04-22T01:25:42+5:302016-04-22T01:25:42+5:30
महापालिकेने सारसबागेसमोर (गरवारे बालभवन पटांगण) तयार केलेल्या बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालनाचे उद््घाटन शुक्रवारी (दि. २२) सकाळी १० वाजता होत आहे.
पुणे : महापालिकेने सारसबागेसमोर (गरवारे बालभवन पटांगण) तयार केलेल्या बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालनाचे उद््घाटन शुक्रवारी (दि. २२) सकाळी १० वाजता होत आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बऱ्याच कालवधीने एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत.
भाजपाचा स्वतंत्र विदर्भाला असलेला छुपा पाठिंबा तसेच महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात शेरेताशेरे होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होते आहे.
बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्यात राजकीय मतभेद असले, तरी त्यांची मैत्रीही प्रसिद्ध होती. तिचे किस्से आजही सांगितले जातात. राजकारणात असले, तरी त्यांनी या मैत्रीत कधीही कटुता येऊ दिली नाही. त्यामुळेच त्यांच्या स्मृतीनिमित्त तयार केलेल्या या कलादालनाच्या उद््घाटनासाठी पवार यांना खास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याच हस्ते कलादालनाचे उद््घाटन होत आहे.
‘मोठा भाऊ’ असलेल्या शिवसेनेला निवडणुकीनंतर ‘धाकट्या भावाची’ भूमिका वठवावी लागत असल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सत्तेतील प्रमुख घटक असलेल्या भारतीय जनता पक्षाप्रति असलेली आपली अस्वस्थता कायम जाहीरपणे व्यक्त करीत असतात. त्यांच्या या अस्वस्थतेला चिमटा काढण्याची संधी पवार सोडणार नाहीत, असे बोलले जात आहे. ठाकरे यांच्याकडूनही त्यांना उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.