पोलिसांकडून कसून चौकशी
By Admin | Published: December 6, 2014 10:48 PM2014-12-06T22:48:10+5:302014-12-06T22:48:10+5:30
पिंपळगाव (ता. दौंड) येथील नितीनमहाराज (टोमॅटो बाबा) याला चौकशीसाठी यवत पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले होते. दरम्यान, नितीनमहाराजाची कसून चौकशी करण्यात आली
दौंड : पिंपळगाव (ता. दौंड) येथील नितीनमहाराज (टोमॅटो बाबा) याला चौकशीसाठी यवत पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले होते. दरम्यान, नितीनमहाराजाची कसून चौकशी करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले. नितीनमहाराज, त्यांचे सहकारी आणि काही भक्तांची चौकशी करण्यात आली. त्यानुसार गेल्या महिन्यात टोमॅटोचा रस हा चाचणीसाठी केमिकल अॅनालाईसला पाठविला आहे. त्याचा अहवाल मंगळवार (दि. 8) रोजी येणो अपेक्षित आहे. एकंदरीतच या प्रकरणी योग्य ती चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे नारायण सारंगकर यांनी सांगितले.
पिंपळगाव (ता. दौंड) परिसरात फिरंगाईमाता मंदिराच्या डोंगरावर टोमॅटोचा रस प्रसाद म्हणून नितीनमहाराज भक्तांना देत होता. दरम्यान, हा रस पिल्याने आजार बरे होतात, अशी भावना भाविकांची झाल्याने नितीनमहाराजाच्या दरबारात लाखो भाविक येत होते. (वार्ताहर)
टोमॅटो महाराजावर कारवाईची मागणी
नितीनमहाराजाने आपला गाशा गुंडाळला, या विषयीचे सचित्र वृत्त लोकमतने शनिवार (दि. 6) रोजी प्रसिद्ध केल्याने याबाबत जिल्ह्यात खळबळ उडाल्याने याविषयी दिवसभर तर्कवितर्क लढविले जात होते. एकीकडे शासन अंधश्रद्धा निमरूलनाविषयी जनजागृती करीत असताना शासनाच्याच जागेत या महाराजाने अंधश्रद्धेचे दुकान मांडले होते. तेव्हा शासनाच्या जागेचा अंधश्रद्धेसाठी गैरवापर केला म्हणून या महाराजावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून पुढे आली आहे.
अन्यथा कठोर कारवाई करू
पिंपळगाव (ता. दौंड) येथे फिरंगाईमातेच्या डोंगरावर नितीनमहाराज याचा दरबार असून, या ठिकाणी शेड, तसेच भाविकांच्या रांगेसाठी उभारण्यात लोखंडी पाईप आणि पूल हा नितीनमहाराजाने तातडीने काढून टाकावा, अन्यथा या संदर्भात वन खात्याच्या वतीने कडक कारवाई केली जाईल, अशी सूचना वन खात्याने दिली असल्याचे समजते.