‘इलेक्टिव्ह मेरिट’ असणाऱ्यांना हलगी वाजवत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:12 AM2021-02-13T04:12:52+5:302021-02-13T04:12:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “सध्या आम्ही सत्तेवर असल्याने इतर पक्षातील नेते, कार्यकर्ते विविध कामासांठी भेटत असतात. ते भेटले ...

Those with 'Elective Merit' will be taken lightly | ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असणाऱ्यांना हलगी वाजवत घेणार

‘इलेक्टिव्ह मेरिट’ असणाऱ्यांना हलगी वाजवत घेणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “सध्या आम्ही सत्तेवर असल्याने इतर पक्षातील नेते, कार्यकर्ते विविध कामासांठी भेटत असतात. ते भेटले म्हणजे लगेच आमच्या पक्षात येणार असे होत नाही. पण सध्या आमच्या पक्षात येण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत. ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असणाऱ्यांना आमच्या पक्षात नुसता प्रवेश देणार नाही तर हलगी वाजवत पक्षात घेणार,” असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री अजित पवार यांनी उंबरठ्यावर आलेल्या महापालिका निवडणुकीची रणनीतीच स्पष्ट केली. एवढेच नाही तर पुणे महापालिकेची सत्ता खेचून घेणार असे सांगत निवडणुकीसाठी शड्डु ठोकला.

चोवीस तासांपूर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेत बैठक घेतली. आगामी निवडणूक स्वबळावर लढवून पालिका पुन्हा जिंकणार असाही दावा केला. या पार्श्वभूमीवर पवार यांनी शुक्रवारी (दि. १२) ‘राष्ट्रवादी’ची भूमिका मांडली. या ठोस वक्तव्याद्वारे सध्या भाजपात असणाऱ्या परंतु पूर्वाश्रमी ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी’च्या गोटात असलेल्या नगरसेवकांना पवार यांनी आमंत्रणच दिल्याचे मानले जात आहे. यामुळे पक्ष सांभाळण्याचे भाजपापुढचे आव्हान वाढले असल्याचे मानले जात आहे.

भाजपमधील अनेक नगरसेवक ‘राष्ट्रवादी’च्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले, “जे सत्तेत असतात त्यांच्याकडे येणाऱ्यांचा ओघ सुरूच असतो त्यात काही नवीन नाही. पण आम्ही आता पक्षात प्रवेश देताना केवळ ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असणाऱ्यांना प्रवेश देणार आहोत.” पुणे महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता येणार या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याबद्दल पवार म्हणाले, “सत्ताधारी पक्ष म्हणत असत की यावेळी पुन्हा आमचीच सत्ता येणार. विरोधी पक्ष असतात ते म्हणतात ‘आम्ही खेचून घेणार’. पण आज मी सांगतो पुणे महापालिकेत मी सत्ता खेचून घेणार.”

चौकट

‘ईव्हीएम’वर पवारांचा विश्वास

राज्य शासन ‘ईव्हीएम’ बाबत वेगळा विचार करत आहे. यावर तुमचे मत काय या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “माझा ईव्हीएम वर विश्वास आहे, मात्र ते माझे वैयक्तिक मत आहे. ही सरकारची भूमिका नसून याविषयी चर्चेअंती निर्णय घेण्यात येईल.”

Web Title: Those with 'Elective Merit' will be taken lightly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.