‘त्या’ अधिकाऱ्यांची होणार चौकशी
By Admin | Published: April 4, 2016 01:16 AM2016-04-04T01:16:57+5:302016-04-04T01:16:57+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षयरोग तपासणी उपकरण खरेदी प्रकरणातील अनियमितता व मशिन विनावापर पडून राहण्यास जबाबदार असणाऱ्या निवृत्त
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षयरोग तपासणी उपकरण खरेदी प्रकरणातील अनियमितता व मशिन विनावापर पडून राहण्यास जबाबदार असणाऱ्या निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचा आदेश नगरविकास विभागाने आयुक्तांना दिला आहे.
क्षयरोग तपासणी उपकरण खरेदी प्रकरणातील अनियमितता व मशिन विनावापर पडून असल्याबाबतच्या मुद्द्यावर विधान परिषद आणि विधानसभेत चर्चा झाली होती. त्यानंतर या प्रकरणाची द्विसदस्यीय समितीने चौकशी केली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, तत्कालीन अधिकारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी, डॉ. राजशेखर अय्यर, डॉ. आनंद जगदाळे या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले. हे अधिकारी निवृत्त
झाल्याने त्यांच्या विभागीय चौकशीच्या कार्यवाहीसाठी आयुक्तांना नियुक्त करावे, असा प्रस्ताव देण्यात आला होता.
या प्रस्तावावर आॅगस्ट २०१४ ला महासभेत चर्चा झाली. हे अधिकारी निवृत्त झाल्याने त्यांच्या चौकशीसाठी अधिकारी नेमण्याचा प्रस्ताव
दप्तरी दाखल करण्याचा ठराव महासभेने मंजूर केला. त्यानंतर आयुक्तांनी राज्य सरकारला पत्र पाठवून अशा ठरावामुळे प्रशासनावर होणाऱ्या अनिष्ट परिणामाचा विचार करता सभेच्या ठरावाची अंमलबजावणी योग्य होणार नाही, असे स्पष्ट करून हा ठराव
विखंडित करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्यानंतर महासभेचा ठराव डिसेंबर २०१५ मध्ये शासनाने विखंडित केला. (प्रतिनिधी)