मीटरने पाणी पुरवठा होणाऱ्या मिळकतींनी 31 मार्चपर्यंत थकबाकी भरावी
By राजू हिंगे | Published: March 6, 2024 09:46 AM2024-03-06T09:46:00+5:302024-03-06T09:46:26+5:30
पिण्याच्या पाण्याची थकबाकी राहिल्यास येत्या एक एप्रिल पासून दरमहा एक टक्का दंड आकारण्यात येणार
पुणे : महापालिका व्यावसायिक आणि काही निवासी मिळकतींना मीटरद्वारे पाणी पुरवठा करते. तसेच पुणे आणि खडकी कॅन्टोंन्मेंटलाही मीटरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. पाण्याच्या वापरानुसार बिलाची आकारणी करण्यात येते. परंतू आतापर्यंत थकित बिलावर कोणताही दंड अथवा व्याज आकारण्यात येत नव्हते. यामुळे बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे मीटरद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची थकबाकी राहिल्यास येत्या एक एप्रिल पासून दरमहा एक टक्का दंड आकारण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनाने आगामी आर्थिक वर्ष सुरू होताना एक एप्रिल पासून थकीत पाणी बिलावर दरमहा एक टक्का दंड आकारण्याची घोषणा जानेवारीमध्ये केली आहे. या घोषणेनुसार कुठल्याही दंडाशिवाय येत्या ३१ मार्चपर्यंत थकबाकी भरता येणार आहे. परंतू एक एप्रिलनंतर मात्र या थकबाकीवर दरमहा एक टक्का दंड आकारण्यात येणार आहे.थकबाकीदारांना त्यांचे बिल मिळाले नसल्यास पाणी पुरवठा विभागाच्या लष्कर, स्वारगेट, एसएनटीडी- चतुश्रृंगी पाणी पुरवठा विभागातील कार्यालयातून बिल घ्यावे.नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत यापुर्वीच्या थकबाकीची रक्कम भरावी आणि दंड टाळावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केली आहे.