विद्यापीठात फिरायला येणाऱ्यांनो, आधी दरमहा हजार रुपये जमा करा; तरच प्रवेश मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 10:50 PM2021-06-11T22:50:37+5:302021-06-11T22:51:40+5:30
ऑक्सि पार्क योजना जाहीर : कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढले परिपत्रक; तीव्र विरोध होण्याची शक्यता
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फिरायला येणाऱ्यांना आता दरमहा एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याबाबत आधी शुल्क जमा करा, तरच विद्यापीठात प्रवेश मिळेल, असे स्पष्ट केल्याने पुणेकरांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याबाबत परिपत्रक कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काढले. त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना विद्यापीठाच्या ४११ एकर परिसराचा विहार करण्याचा आनंद घेता यावा यासाठी विद्यापीठाने 'SPPU OXY PARK' योजना जाहीर केली होती. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे या योजनेची प्रत्यक्ष अमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र, शुक्रवारी (दि.११) रात्री उशिरा याबाबत कुलसचिव डॉ. पवार यांनी परिपत्रक काढले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून येत्या २१ जूनपासून योजना लागू करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.
विद्यापीठात अभ्यागताना सकाळी आणि संध्याकाळी फिरायला यायचे असेल तर आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच एक हजार रुपयांचा धनादेश सुरक्षा विभागाकडे कार्यालयीन वेळेत जमा करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे सदस्यांना ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जाणार आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला आहे. तुम्हाला शुल्क न भरता प्रवेश हवा असेल तर तसा प्रस्ताव द्या, व्यवस्थापन समिती त्यावर चर्चा करून निर्णय घेईल, असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.
------
निर्णयाला तीव्र विरोध होणार
विद्यापीठाने परिपत्रक काढल्यानंतर पुणेकरांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा विद्यार्थी संघटना बरोबरच पुणेकरांनी दिला आहे.