जवानांना संरक्षण न देणाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही; शरद पवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 09:01 AM2023-04-18T09:01:16+5:302023-04-18T09:01:28+5:30
पुलवामामध्ये जवानांना विमाने न मिळाल्याने त्याचा जीव गेला, त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही
सासवड (पुणे) : ज्या सरकारला देशाच्या जवानांचे संरक्षण करता येत नाही, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. सासवड (ता. पुरंदर) येथे सोमवारी आयोजित शेतकरी व युवक मेळाव्यात ते बोलत होते.
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाल्याचा आरोप केला होता. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘पुलवामामध्ये जवानांना विमाने न मिळाल्याने त्याचा जीव गेला, त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही,’ असे पवार म्हणाले.
आज शेतकरी अडचणीत आहे. अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. संकटातील शेतकऱ्यांना बाहेर काढणे सरकारची जबाबदारी आहे. शेतकरी आत्महत्या करतात, हे दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने मदत केली पाहिजे, असेही पवार म्हणाले.