'चुकीचं विधान करणाऱ्यांनी कारवाईसाठी तयार रहावं', चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 01:59 PM2021-12-13T13:59:38+5:302021-12-13T13:59:47+5:30
दिल्लीच्या मंडावली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. संजय राऊतांविरोधात कलम ५०० आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे
पुणे : संजय राऊत यांनी एका मुलाखतीत भाजपा कार्यकर्त्यांविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्लीच्या मंडावली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. संजय राऊतांविरोधात कलम ५०० आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. महिलांचा अवमान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊतांनी भाजपा कार्यकर्त्यांविरोधात अपशब्द वापरले होते. त्यात महिलांबाबतही चुकीचे शब्द होते. त्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरच चंद्रकांत पाटलांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ''चुकीचं विधान करणाऱ्यांनी कारवाईसाठी तयार रहावं'' असे पाटील म्हणाले आहेत. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
''एखादं वक्तव्य केलं आणि ते चुकीचे असेल तर होणाऱ्या कारवाईची पण तयारी ठेवली पाहिजे. त्यामुळे त्यांनी वापरलेला तो शब्द चुकीचा आहे की नाही ते त्यांनी आता पोलिसांना किंवा न्यायालयात सांगावे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.''
पाटील म्हणाले, या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराची परिसीमा चालली आहे. म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटला त्याची पाळेमुळे थेट मंत्रालयात आहेत. हे सरकार सगळ्यांच्या जीवाशी खेळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी, आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांची कर्जमाफी, नुकसानभरपाई या सर्वांच्या जीवनाशी हे सरकार खेळत आहे.
कोरोना काळात भाजपचा कार्यकर्ता प्रत्यक्ष फिल्डवर होता
''महापौरांसहीत सर्वांचा कोरोना काळातील ठेके मिळवण्यावरच भर होता. कोव्हीड सेंटरमधल्या एका थाळीची किंमत ४०० रुपये होती. कोव्हीडमध्ये सुद्धा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम केले. त्याच काळात भाजपचा कार्यकर्ता प्रत्यक्ष फिल्डवर होता. पालघर जिल्ह्यात भाजपचे ३७ कार्यकर्ते गेले. त्यामुळे लोकांना दूध का दूध पाणी का पाणी कळते असेही ते यावेळी म्हणाले आहेत.''