विनाकारण फिरणाऱ्यांना दिवसा समज, रात्री कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:11 AM2021-04-16T04:11:22+5:302021-04-16T04:11:22+5:30
पुणे : संचारबंदी लागू होऊनही काही नागरिक घराबाहेर पडत आहेत. दिवसा विनाकारण फिरणाऱ्यांना समज देण्याचे धोरण आहे. मात्र, रात्री ...
पुणे : संचारबंदी लागू होऊनही काही नागरिक घराबाहेर पडत आहेत. दिवसा विनाकारण फिरणाऱ्यांना समज देण्याचे धोरण आहे. मात्र, रात्री बाहेर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.
गुप्ता म्हणाले, पुण्यात संचारबंदी लागू झाली असूनही काही नागरिक हे घराबाहेर पडताना दिसत आहेत. मात्र, दहा टक्के लोकच विनाकारण बाहेर येत आहेत. महत्त्वाची कारणे वगळता दिवसा विनाकारण बाहेर पडणा-या नागरिकांना पोलिसांकडून समज दिली जात आहे. मात्र रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणा-या नागरिकांबाबत कोणतीही हयगय केली जाणार नाही. त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
दंड करण्याचा अधिकार
शासनाकडून विनाकारण फिरणाऱ्यांना तसेच मास्कविना फिरणाऱ्यांवर दंड करण्याचा अधिकार देण्याचा आदेश आला आहे. त्यामुळे रस्त्यावर येण्याचे कारण योग्य नसेल तर कारवाई करावी लागेल. सुरूवातीला पोलीस सामंजस्याची भूमिका घेत आहेत. चौकशी करून घरी पाठवित आहेत. पुण्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत २-३ ठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. शहरात १०० पेक्षा जास्त नाके आहेत. सकाळी हजारपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी रस्त्यावर होते.
उद्या सायंकाळपासूनचा विकेंड लॉकडाऊन कडक
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून सोमवारी सकाळपर्यंत विकेंड लॉॅकडाऊन आहे. यावेळी पोलीस कडक धोरण अवलंबणार आहेत. या काळात काही वेळासाठी केवळ दूध मिळणार आहे. मेडिकल वगळता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडणार नाहीत. लोकांना पाच दिवसांचा वेळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आहे. त्यामुळे या काळात बाहेर पडू नये, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
जीवनावश्यक वस्तू कडक लावणार