जे जमिनीवर राहणार नाहीत, त्यांनी आरक्षण घेऊ नये; मनोज जरांगेंचं नारायण राणेंना एका वाक्यात उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 11:59 AM2023-10-20T11:59:42+5:302023-10-20T12:01:48+5:30
आज मनोज जरांगे पाटील पुणे जिल्ह्यात सभा घेणार आहेत.
पुणे-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे पु्न्हा एकदा मराठा आरक्षणाची चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर ४० दिवसांचा अवधी दिला आहे, काही दिवसापूर्वी अंतरवली सराटी या गावात आरक्षणा संदर्भात मोठी सभाही झाली. या सभेत सरकारने लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे अशी, मागणी जरांगे यांनी केली. दरम्यान, काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 'मराठा समाज वेगळा, कुणबी समाज वेगळा. मनोज जरांगे पाटील यांनी जरा अभ्यास करावा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहे, असे मत व्यक्त केलं. यावरुन आता आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत.
मराठा कुणबी वेगवेगळे, मला ते प्रमाणपत्र नको, जरांगेंनी अभ्यास करावा; नारायण राणेंचा विरोध
मनोज जरांगे पाटील यांनी आज नारायण राणे यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्यातील कानाकोपऱ्यातील मराठा समाज आरक्षण मागत आहेत. कुणबी घेण्याला काही वाईट नाही, कुणबी म्हणजे शेती, आमचा बाप शेती करतो मग तो श्रीमंत मराठा असला तरीही शेती करतो. जे जमिनीवर राहणार नाहीत, मायभूमीत राहणार नाहीत त्यांनी आरक्षण घेऊ नये, असंही जरांगे पाटील म्हणाले.
'ज्या ठिकाणी मराठा समाज आहे, त्या ठिकाणी मी जाणार आहे. मला सामान्य मराठ्यांचा पाठिंबा आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे काय म्हणाले?
मराठा समाज वेगळा, कुणबी समाज वेगळा. मनोज जरांगे पाटील यांनी जरा अभ्यास करावा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहे, असे मत केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी गुरुवारी पत्र परिषदेत व्यक्त केले.
राणे म्हणाले की, राज्य सरकारला एखाद्या जातीला आरक्षण द्यायचे असेल तर त्यासाठीच्या घटनात्मक तरतुदी काय आहेत याचाही जरांगे यांनी अभ्यास करावा. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. ९६ कुळी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र नको आहे. मी देखील मराठा आहे आणि मला कुणबी प्रमाणपत्र नको आहे. जरांगे म्हणतात तसे मराठा आणि कुणबी एकच आहेत असे म्हणणे योग्य ठरणार नाही.