काम करणारे पुढे या, मिरवणाऱ्यांनो बाजूला व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:14 AM2021-08-15T04:14:29+5:302021-08-15T04:14:29+5:30
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रशासनाप्रमाणेच कार्यकर्त्यांवर चांगलाच वचक आहे. आपल्या रोखठोक स्वभावासाठी पवार ओळखले जातात. एक ...
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रशासनाप्रमाणेच कार्यकर्त्यांवर चांगलाच वचक आहे. आपल्या रोखठोक स्वभावासाठी पवार ओळखले जातात. एक घाव दोन तुकडे, याच पद्धतीने ते नेहमी काम करतात. शनिवारी (दि.१४) बारामती शहरातील एका कार्यक्रमात केवळ फोटोसाठी पुढे पुढे करणारे काही जण पवार यांना खटकले. भर कार्यक्रमात पवार यांनी संबंधितांना काम करणारे पुढे या, मिरवणाऱ्यांनी बाजूला व्हा, अशा शब्दात सुनावले. त्यानंतर संबंधित कार्यकर्ते बाजुला झाले.
उपमुख्यमंत्री पवार राज्याची जबाबदारी असताना देखील बारामतीकरांसाठी आठवड्यातील एक दिवस वेळ देतात. या काळात शहर, तालुक्यातील विकासकामांच्या दर्जाची पाहणी आवश्यक कामे, कोरोना आढावा आदी कामे मार्गी लावण्यास वेळ देतात. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.१३) सायंकाळपासून पवार यांनी अचानक भेट देत विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर ते शनिवारी पहाटेपासूनच पुन्हा त्यांनी बारामतीतील विकासकामांची पाहणी करून शासकीय आढावा बैठकीसाठी ते विद्या प्रतिष्ठान येथे आले. यावेळी शहरातील तांदळवाडी वेस तरुण मंडळाच्यावतीने पूरग्रस्तांना मदत व स्वर्गीय तुकाराम भापकर प्रतिष्ठानकडून झाडांसाठी मोफत पाण्याचे टँकर देण्यात आले. मात्र, त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी काहीजण बिनकामाचे पुढे पुढे करीत असल्याचे लक्षात आले. मात्र, पवार यांनी संबंधितांना भर कार्यक्रमात सुनावले. त्यामुळे उत्साही कार्यकर्ते बाजुला झाले. मात्र, यावेळी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पवारांनी प्रोत्साहन देत त्यांचे कौतुक केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांनी दोन दिवसांत क्रीडा संकुल बारामती, ज्येष्ठ नागरिक संघ, कुस्ती केंद्र तालीम इमारत आणि पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिका-यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या.
फोटोओळी— बारामती शहरातील याच कार्यक्रमात केवळ फोटोसाठी पुढे पुढे करणा-या काहीजणांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या.
१४०८२०२१ बारामती—१०