सत्तेत नसले तरी टीकेला पवारच लागतात : सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 02:07 PM2018-06-11T14:07:31+5:302018-06-11T14:11:01+5:30
पुणे महापालिकेत शहराच्या विवीध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी म्हणून खासदार सुळे यांनी सोमवारी सकाळी आयुक्त सौरव राव यांचु भेट घेतली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बाेलताना त्यांनी राज्यसरकारवर सडकून टीका केली.
पुणे: गेले ४ वर्षे शरद पवार सत्तेत नाहीत. मात्र तरीही टीका करायला तेच लागतात, कारण त्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार यांच्या टिकाकारांचा समाचार घेतला.
पुणे महापालिकेत शहराच्या विवीध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी म्हणून खासदार सुळे यांनी सोमवारी सकाळी आयुक्त सौरव राव यांचु भेट घेतली. बैठकीनतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी केंद्र व राज्य सरकार वर सडकून टीका केली. डार्विनचा सिद्धांत चुकीचा असे या़चे शिक्षणमंत्री म्हणत असतील तर काय बोलायचे असा प्रश्न करून सुळे म्हणाल्या, या सरकारचा व विशेषतः पंतप्रधानांच्या भवताली असणाऱ्यांचा विज्ञानावर विश्वासच नाही असे वाटते. त्यामुळे त्यांना कधी सीता टेस्ट ट्यूब बेबी वाटते तर कधी भारतात पुर्वी सगळे होतेच असे सांगितले जाते. काहीही आधार नसलेले बोलले जात आहे. महिलांविषयी बेताल वक्तव्ये केली जात आहेत. हे बरोबर नाही. त्यांना उत्तर द्यायचीही गरज नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन राज्याच्या सर्व भागात होत आहे. पुण्याचे रविवारी झाले आता कोकणात होणार आहे. नंतर नाशिकला घेतले जाईल. जनताच या सरकायच्या विरोधात चालली आहे. शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका केली जाते, मात्र त्याला तेही कधी उत्तर देत नाहीत व मीही देणार नाही. जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण अशा सुसंस्कृत नेत्यांचे संस्कार पवार साहेब व नंतर आमच्यावर झाले आहेत, त्यामुळे टीकेची पर्वा करत नाही, सत्तेत येवून चार वर्ष झाली तरीही टीका करण्यासाठी अजून पवारच लागतात यावरून त्यांचे महत्त्व समजते असे सुळे म्हणाल्या. समाविष्ट 11 गावांमध्ये रस्ते पाणी आरोग्य अशा मुलभूत समस्यांवर काम होण्याची गरज आहे. 8 महिन्यांनतरही पालिका काही करत नाही असेच चित्र आहे. आयुक्तांनी लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती सुळे यांनी दिली. महाकवी गदिमा यांचे स्मारक ही गोष्ट महापालिकेला अभिमानाची वाटली पाहिजे. सगळ्या महाराष्ट्राला समाधान वाटेल असे त्यांचे स्मारक इथे व्हायला हवे. त्यावर काही होत नाही हे खेदजनक आहे असे सुळे यांनी सांगितले. आयुक्तांना त्याविषयीही सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक विशाल तांबे, सचिन दोडके, योगेश ससाणे आदी सुळे यांच्यासमवेत होते.