भगवान गौतम बुद्धांचे विचार अखंड प्रेरणेचा स्रोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:30+5:302021-07-19T04:08:30+5:30
पुणे : भगवान गौतम बुद्ध प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारांतून मिळते. त्यांनी सांगितलेली चार ...
पुणे : भगवान गौतम बुद्ध प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारांतून मिळते. त्यांनी सांगितलेली चार सत्ये आणि अष्टांगिक मार्गाचे अनुसरण केले तर आपले जीवन आनंदी होईल. कोरोनाच्या कठीण काळात सकारात्मक राहण्यासाठी, या परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडण्यासाठी बुद्धांचे विचार अंगीकारावेत, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक शरद गोरे यांनी केले.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या ‘नॉलेज मॅनेजमेंट इनिशिएटिव्ह’अंतर्गत आयोजित प्रतिभावंतांच्या व्याख्यानमालेच्या उद्घाटनावेळी गोरे बोलत होते. यावेळी ‘गौतम बुद्धांचे विचार’ या विषयावर गोरे यांचे व्याख्यान झाले. दर महिन्याला एका प्रतिभावंत साहित्यिक व विविध क्षेत्रातील वक्त्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. प्रसंगी 'सूर्यदत्ता'तर्फे गोरे यांना गौतम बुद्धांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 'सूर्यदत्ता'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, संचालक प्रा. सुनील धाडीवाल, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, प्रा. अक्षित कुशल उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, "सूर्यदत्तामध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सतत नावीन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात. विचारांचे आदानप्रदान व्हावे, प्रतिभावंतांचे मार्गदर्शन लाभावे, या उद्देशाने नॉलेज मॅनेजमेंट इनिशिएटिव्हअंतर्गत ही व्याख्यानमाला होत असून, साहित्य, सांस्कृतिक, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींना ऐकण्याची संधी दर महिन्याला मिळणार आहे. ही व्याख्याने प्रत्यक्ष, तसेच फेसबुक व यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह होणार आहेत." प्रा. सुनील धाडीवाल यांनीही आपले मनोगत मांडले. प्रा. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले.