पुण्यात रस्त्यांवर यमाचे दर्शन! नुसतेच अपघात अन् थेट मृत्यू; ५ महिन्यात ७७१ जणांचा बळी

By प्रमोद सरवळे | Published: June 19, 2024 04:23 PM2024-06-19T16:23:42+5:302024-06-19T16:40:05+5:30

पुणे जिल्ह्यातील गेल्या काही महिन्यांतील अपघातांचा आकडा पाहिला तर सगळ्यांचेच डोळे चक्रावतील. शेकडो अपघात, शेकडो मृत्यू आणि हजारो जखमी झाल्याचे आकडेवारीतून समोर येते.... (pune accident, pune accident news, pune porsche case, pune city police, pune rural police, pune traffic police, accidents in pune)

thousand accidents and direct deaths in pune city 771 people killed in 5 last months | पुण्यात रस्त्यांवर यमाचे दर्शन! नुसतेच अपघात अन् थेट मृत्यू; ५ महिन्यात ७७१ जणांचा बळी

पुण्यात रस्त्यांवर यमाचे दर्शन! नुसतेच अपघात अन् थेट मृत्यू; ५ महिन्यात ७७१ जणांचा बळी

पुणेसांस्कृतिक गोष्टींचा वारसा, ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा, पेशवेकालीन वास्तू, संग्रहालये असे हे विद्येच्या माहेरघरात वसलेले पुणे शहर. एकेकाळी पुण्याच्या रस्त्यावरून, गल्ल्लीबोळातून फिरताना मन प्रसन्न होत असे. मात्र मध्यंतरीच्या काळात पुण्यातील वाढती लोकसंख्या, वाहतुकींचे प्रमाण, प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे शहराची वाट लागण्यास सुरुवात झाली. वाहनांच्या वाढत्या संख्येकडे सुस्त प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. रस्त्यांवर नियमांचे उल्लंघन होण्यास सुरुवात झाली. त्याची तीव्रता इतकी वाढत गेली की अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले. अशातच शहर मृत्यूचा सापळा कधी बनले हे समजलेच नाही. 

सध्या रस्त्यांवरील वाढती गर्दी, हॉर्न आणि अचानक एखादी ट्रक वेगात बाजूने गेली की अंगावर शहारे येऊन जातात. पीएमपी बस पाठीमागून वेगात येते आणि आपल्या कानाजवळ येऊन ब्रेक मारते अन् डोळ्यांसमोर यम दिसतो. रात्री बाहेर घराबाहेर फेरफटका मारायला गेल्यावर तो परत येईल का हेदेखील सांगता येत नाही. याला कारण आहे ते पुणे शहरासह जिल्ह्यातील वाढलेले विक्रमी अपघात.

शेकडो अपघात, शेकडो मृत्यू

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण राज्यात चांगलेच गाजले. यामध्ये अल्पवयीन मुलाने दारू पिऊन बेदरकारपणे धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाला निबंध लिहण्याची शिक्षा दिल्याने देशभरात संतापाची लाट पसरली होती. अपघाताची ही केस माध्यमांनी आणि नागरिकांनी लावून धरल्याने प्रशासन कारवाई करताना दिसले. पण असे अनेक अपघात पुणे जिल्हा परिसरात होत आहेत. यामध्ये अनेक निष्पापांचा बळी जातोय. पुणे जिल्ह्यातील गेल्या काही महिन्यांतील अपघातांचा आकडा पाहिला तर सगळ्यांचेच डोळे चक्रावतील. शेकडो अपघात, शेकडो मृत्यू आणि हजारो जखमी झाल्याचे आकडेवारीतून समोर येते. २०२४ मध्ये पुणे शहर पोलिस आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत आतापर्यंत ७७१ जणांचा मृत्यू झालाय.

पुणे ग्रामीणमध्ये ६०२ निष्पापांचा बळी -

पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत १ जानेवारी ते ३१ मे २०२४ या दरम्यान १ हजार ७२ अपघात झाले असून यामध्ये ६०२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ८८८ मोठे अपघात आणि ४८४ दुचाकींचे अपघात झाले आहेत. मोठ्या अपघातात ३८३ जणांचा मृत्यू झाला असून ६६७ जण जखमी झाले आहेत. तर दुचाकीच्या ४८४ अपघातांमध्ये २२० जणांचा मृत्यू झाला असून ३६५ जण जखमी झाले आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत एकून १२ 'ब्लॅक स्पॉट' आहेत. अपघातांचा विचार केला तर वडगाव मावळ परिसरात सर्वाधिक अपघात होत आहेत. 

पुणे शहराच्या हद्दीत १६९ जणांचा मृत्यू-

पुणे शहर पोलिंसाच्या हद्दीत यावर्षी १ जानेवारी ते १३ जून २०२४ पर्यंतची अपघातांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. याकाळात शहर परिसरात ५८७ अपघात झाले. यामध्ये १६९ जणांचा मृत्यू झाला असून ४८८ जण जखमी झाले आहेत. शहरातील कात्रज-कोंढवा, कात्रज- देहू बायपास या रस्त्यांवर तसेच नवले पूल परिसरात अपघाताचे मोठे प्रमाण आहे. बेदरकारपणे गाडी चालवणे, वेगमर्यादा न पाळणे आणि वाहतुकींच्या नियमांचे पालन न करणे ही शहरातील अपघाताची मुख्य कारणे आहेत.

पुणे जिल्ह्यातील अपघाताची कारणे -

  • अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देणे
  • दारू पिऊन गाडी चालवणे
  • नियमांचे पालन न करता वाहने चालवणे
  • रात्रीच्या वेळी इतरांची परवा न करता भरधाव वाहने चालवणे.
  • सिग्नल तोडणे, फुटपाथवरून वाहने चालवणे, नो एन्ट्रीतून वेगाने जाणे
  • महामार्गावर वेगमर्यादा न पाळणे
  • रस्त्यावरील खड्ड्यांमुळे
  • रात्रीच्या वेळी वाहतूक नियमनासाठी पोलीस नसल्यामुळे
  • ट्राफिक साईन बोर्ड नसल्यामुळे
  • रस्त्यावर वाहतुकीस आडवी आलेली झाडे

 

अपघातांचा आकडा कमी होण्यासाठी शहरात ज्या ठिकाणी 'ब्लॅक स्पॉट' आहेत तेथील रोडची दुरूस्ती करून घेतली जातेय. ठिकठिकाणी वेगवेगळे 'ट्राफिक साईन' लावले जात आहेत. अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यास त्या मुलाच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल केला जातोय. शिवाजीनगर आणि कोथरूड परिसरात अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. वाहतुकीचे

- रोहिदास पवार (पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा पुणे शहर)

ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत एकूण १२ 'ब्लॅक स्पॉट' आहेत. अपघात होऊ नये यासाठी त्या सर्व ठिकाणी योग्य उपाययोजना केली जात आहे. बऱ्याच वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. तसेच भरधाव वाहने चालवली जातात त्यामुळे अपघात होतात. पुणे ग्रामीण पोलीस अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी मोहिम राबवली जात आहे.

- संतोष गिरीगोसावी, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, पुणे ग्रामीण पोलीस 

 

Web Title: thousand accidents and direct deaths in pune city 771 people killed in 5 last months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.