प्रभात पुरस्कारांवर ‘एक हजाराची नोट’ची मोहोर
By Admin | Published: June 2, 2015 05:02 AM2015-06-02T05:02:00+5:302015-06-02T05:02:00+5:30
आॅनलाईन मतदानावर मिनिटा-मिनिटाला उत्कंठा वाढविणाऱ्या प्रभात पुरस्कारांची आॅनलाईन घोषणा सोमवारी झाली. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना ‘
पुणे : आॅनलाईन मतदानावर मिनिटा-मिनिटाला उत्कंठा वाढविणाऱ्या प्रभात पुरस्कारांची आॅनलाईन घोषणा सोमवारी झाली. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. इतर पुरस्कारांत ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटाने मोहोर उमटविली आहे.
फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील (एफटीआयआय) प्रभात कंपनीच्या म्युझियममध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते ‘प्रभात जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, प्रभातचे विवेक दामले, अनिल दामले, निवेदक राजेश दामले उपस्थित होते.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘आॅनलाईन’ माध्यमातून निवड करण्याचा हा नवीन पायंडा ‘प्रभात’ने पाडला. दुपारी १२ नंतर प्रत्येक तासाला ४ पुरस्कार घोषित करण्यात येत होते. त्यामुळे सर्वांची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत होती. अशा प्रकारे एकूण २७ पुरस्कारांची आॅनलाईन नावे जाहीर करण्यात आली.
आयुष्यभर चित्रपटांचा ध्यास घेतलेल्या राजदत्त यांच्यासारख्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला, याचा मनस्वी आनंद होत असल्याचे डॉ. जब्बार पटेल म्हणाले.