हजार विद्यार्थी, २६ वर्ग अन् १४ शिक्षक
By admin | Published: July 5, 2017 03:31 AM2017-07-05T03:31:24+5:302017-07-05T03:31:24+5:30
येथील गुंजन चौकानजीक सर्व्हे नं. ४अ/१ आणि २ येथे असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिराच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
येरवडा : येथील गुंजन चौकानजीक सर्व्हे नं. ४अ/१ आणि २ येथे असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिराच्या मागील बाजूस असलेल्या क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे ई-लर्निंग स्कूलमध्ये एकूण पाच मजली इमारतीमध्ये एलकेजी ते सातवी इयत्तेपर्यंत सुमारे एक हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. या शाळेत एकूण २६ वर्ग असून मुख्याध्यापिकेसह केवळ १४ शिक्षक-शिक्षिका शिकविण्यासाठी असल्याने विद्यार्थ्यांचे अध्ययनाचे आणि शिक्षकांच्या अध्यापनाचे मूल्यमापन काय आणि कसे असेल, याबाबत गंभीर वस्तुस्थिती समोर आली आहे.
१० जून २०१२ रोजी सुरू झालेल्या क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे ई-लर्निंग स्कूलची संकल्पना नगरसेवक अॅड. अविनाश साळवे यांची असून, येरवडा आणि परिसरामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या तसेच मोलमजुरी आणि धुण्याभांड्याचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या पालकांच्या मुला-मुलींना आधुनिक आणि अद्ययावत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे,हा शाळा सुरू करण्यामागचा उद्देश होता. या शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाकडून वह्या, पुस्तके, दप्तर, गणवेश आणि सर्व शैक्षणिक साहित्य मोफत पुरविले जाते. शिवाय शाळेची कोणतीही शैक्षणिक फी नाही. त्यामुळे येरवडा परिसरातील गोरगरीब आणि गरजू मुला-मुलींना या ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास पालक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांची मोठ्या प्रमाणात इच्छा असल्याचे दिसून येते.
मात्र भौतिक सुविधांच्या बाबतीतसुद्धा या शाळेमध्ये बहुतांश कमतरता असल्याने पालकवर्ग नाराज आहे. संपूर्ण पाच मजली इमारतीमध्ये असलेल्या अनेक वर्गखोल्या धूळ खातच पडून आहेत. तर संपूर्ण इमारतीसाठी आतापर्यंत केवळ एकच शिपाई कार्यरत आहे. आतील परिसर कायमस्वरूपी अस्वच्छ असतो. प्रत्येक मजल्यावर विद्यार्थी आणि विद्यार्थिंनीसाठी स्वतंत्र शौचालय आणि स्वच्छतागृह आहे; परंतु त्या ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा असतो. परिणामी अतियश दुर्गंधीयुक्त आणि अस्वच्छ वातावरण आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देणार?
१ नगरसेवक अविनाश साळवे यांच्या प्रयत्नातून या शाळेची इमारत बांधली गेली असून, त्यांच्या विशेष प्रयत्नांतून शाळेसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर नगरसेवक बापू कर्णे यांनीही दरम्यानच्या काळात सांस्कृतिक कला रंगमंदिर आणि ई-लर्निंग स्कूलसाठी विशेष निधी पालिकेकडून उपलब्ध करून घेतला होता.
२ स्वच्छता, पाणी, वीज, शौचालय, स्वच्छतागृह यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी या ई-लर्निंग स्कूलकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज पालक वर्गाकडून व्यक्त केली जाते.
३ शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींना ने-आण करण्यासाठी खासगी गाड्या, दुचाकी गाड्या तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा शाळेच्या आवारात असलेल्या प्रशस्त मैदानात लावलेल्या दिसतात, त्यामुळे शाळा भरताना आणि सुटताना पालकांची, विद्यार्थ्यांची आणि स्थानिक राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची येथे वर्दळ वाढल्याने त्याचा शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत आहे.