भाजप आमदाराच्या लग्नात हजारो सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:11 AM2020-12-22T04:11:09+5:302020-12-22T04:11:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून एका बाजूला राज्यात २२ डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी लावली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून एका बाजूला राज्यात २२ डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी लावली जात असतानाच माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते त्यांचा अतिशय शाही थाटात झालेल्या विवाह समारंभात विरोधी पक्षनेत्यांसह हजोरा नेते कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावरुन सोशल मिडियावर आज दिवसभर सामान्यांना ५० लोकांची मर्यादा असताना राजकीय लोकांना कोणतेही बंधन नाही का अशी टिका होत होती. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस दलानेही कानावर हात ठेवले असून इतर वेळी कोरोनाचे कारणावरुन तातडीने कारवाई करणार्या पोलिसांनी अजून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगितले.
आमदार राम सातपुते यांचा विवाह शुभारंभ लॉन्समध्ये साजरा झाला. या लग्नाला पाहुण्यांची अलोट गर्दी झाली होती. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली होती. सामान्यांसाठी लग्नाला केवळ ५० पाहुण्यांना बोलावण्याची मुभा असताना व नियम मोडल्यास तात्काळ गुन्हे दाखल होत असताना आमदारांना नियमावली नाही का असा सवाल आता विचारण्यात येत आहे.
राम सातपुते यांच्या लग्नाला हजारो पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते. लग्न सोहळ्यातील फोटोमध्ये अनेक पाहुणे आणि नेते मंडळींनी तोंडाला मास्क लावला नसल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या संख्येने गर्दी असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचाही बोजवारा उडाला. लग्नाला उपस्थित राहिलेले फडणवीस, दरेकर यांच्यापासून अनेक नेत्यांना पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे पोलीस बंदोबस्त होता, असे असूनही कोरोनाचा नियम मोडला जात आहे, याचे या राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकारयांनी याकडे दुर्लक्ष केले.
........
हे नेते होते उपस्थित
देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, हर्षवर्धन पाटील, गिरीश बापट, सुभाष देशमुख, निलेश राणे यासारखे भाजपचे दिग्गज नेते लग्नाला उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनीही राम सातपुते यांच्या लग्नाही हजेरी लावली.
......
अद्याप गुन्हा दाखल नाही
याबाबत पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले की, आम्ही तपासणी करीत आहोत. अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.