हजारो बालकांचा शिक्षणाचा श्रीगणेशा उघड्यावरच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 11:24 PM2019-01-10T23:24:54+5:302019-01-10T23:25:24+5:30
हक्काचे छत मिळेना : शहरांतर्गत अंगणवाडी केंद्रांना नगरपालिकेच्या मदतीची गरज
रविकिरण सासवडे
बारामती : नगरपालिका हद्दीतील अंगणवाडी केंद्रातील हजारो बालकांचा शिक्षणाचा श्रीगणेशा अक्षरश: उघड्यावर होत आहे. या बालकांना ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना डोक्यावर छत; त्यामुळे शहरातील अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या हजारो बालकांना आता नगरपालिकेच्या मदतीची गरज आहे.
बारामती नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण २२ अंगणवाड्या आहेत. यांपैकी प्रकल्प १ मध्ये माळेगाव, सातववस्ती, बोरावकेवस्ती, ढवाणवस्ती; तर प्रकल्प २ मध्ये जळोची गावठाण, औद्योगिक वसाहत, मलगुंडेवस्ती, सूर्यनगरी आदी अंगणवाडी केंद्रांना तात्पुरत्या इमारतींची सोय आहे. मात्र, या ठिकाणी इतर सोयीसुविधा पुरवताना बालविकास प्रकल्प विभागाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील अंगणवाडी केंद्रांना हक्काच्या जमिनी नाहीत. तसेच, शहरातील बांधकाम व जागेचे दर गगनाला भिडले असल्याने जिल्हा परिषदेकडून अंगणवाडी केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाला मिळणारा ७ लाख रुपयांचा निधी तोकडा पडतो. तसेच, बालविकास प्रकल्प विभागाला फक्त ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांनाच निधी मिळत असल्याने शहरातील अंगणवाडी केंद्रांना नगरपालिकेच्या मदतीकडे डोळे लावून बसावे लागते. मात्र, नगरपालिकेचे शहरातील अंगणवाडी केंद्रे हडपसर सीडीपीओ विभागाकडे पूर्वीच हस्तांतरित केली आहेत, अशी माहिती नगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी महेश पवार यांनी दिली. मात्र, शहरातील २२ अंगणवाडी केंद्रे अद्याप पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प विभागाकडेच असल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांनी सांगितले.
एकीकडे, बारामती शहर शैक्षणिक हब म्हणून नावारूपाला येत आहे. कला महाविद्यालयांपासून ते अगदी नव्याने सुरू होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण या ठिकाणी मिळते. शैक्षणिक क्षेत्रात पुण्यानंतर बारामती नावारूपाला येत असताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया घालणारी अंगणवाडीच दुर्लक्षित राहत असल्याचे वास्तव शहरात आहे. शहरात कुठे अंगणवाडी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये, रस्त्यावर, झाडाखाली, मंदिरामध्ये भरत आहे. काही महिन्यांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी अंगणवाडी केंद्राच्या अडचणी तातडीने सोडविण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच, अंगणवाडी केंद्रामध्ये वीज व पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मोहीमदेखील बालविकास विभागाच्या मदतीने सुरू केली होती. ग्रामीण भागातील अनेक अंगणवाडी केंद्रांना या मोहिमेचा फायदा झाला. मात्र, शहरातील १४ अंगणवाडी केंद्रे या बाबतीन कमनशिबी ठरली आहेत. या अंगणवाडी केंद्रांना इमारती व इतर मूलभूत सोयीसुविधांची गरज आहे. नगरपालिकेने जरी या अंगणवाडी केंद्रांचे हस्तांतर केले असले, तरी आज हजारो बालके या ठिकाणी शिक्षणाची पहिली पायरी चढत आहेत. अशा वेळी वेगळे प्रयत्न करून या बालकांच्या डोक्यावर छत व मूलभूत सुविधांची सोय करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
आम्ही मागील महिन्यामध्ये नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांची भेट घेतली होती. संबंधित अंगणवाडी केंद्रांची त्यांना माहितीदेखील दिली आहे. बालविकास प्रकल्प विभागाकडे व पंचायत समितीच्या अंतर्गत जरी या अंगणवाड्या येत असल्या, तरी जिल्हा परिषदेकडून फक्त ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांना निधी दिला जातो. इमारत बांधकामासाठी सर्वांत आधी ग्रामपंचायतीकडून संबंधित जागेचा उतारा घेऊन अंगणवाडी केंद्रांना हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात येते. यानंतर जिल्हा परिषद बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देते. मात्र, शहरात अंगणवाडी केंद्रासाठी जागा उपलब्ध तसेच बांधकाम करण्यासाठी नगरपालिकेच्या मदतीची आम्हाला गरज आहे.
- मिथुनकुमार नागमवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी
बारामती पंचायत समिती
संबंधित अंगणवाडी केंद्रांना मदतीसाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील. नगरपालिकेच्या बांधकाम विभागाला शहरातील अंगणवाडी केंद्राच्या इमारतीबाबत यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. या अंगणवाड्यांसाठी खासदार शदर पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फंडातून काही रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. बालकांच्या भवितव्याचा विचार करून पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प विभागाशी सन्मवय साधून चांगल्या सुविधा कशा देता येतील, यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- पौर्णिमा तावरे, नगराध्यक्षा, बारामती नगरपालिका