श्रीक्षेत्र वीर येथे हजारो भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:24 AM2018-08-13T01:24:39+5:302018-08-13T01:24:52+5:30
श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे आषाढ वद्य शनि अमावास्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
परिंचे : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे आषाढ वद्य शनि अमावास्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहाटे चार वाजता पूजा करून मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला.
देवस्थांन ट्रस्ट व भाविकांच्या वतीने देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १० वाजता भाविकांच्या दहीभात पुजा बांधण्यात आल्या. दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. दुपारी १२ वाजता देवाची धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी १.१५ मिनिटांनी मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे आयोजन गणपतराव धुमाळ, रामदादा धुमाळ, सुशीलकुमार जाधव यांच्या वतीने करण्यात आले होते.
देवस्थांन ट्रस्ट मार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, दर्शनबारी, मंदिर परिसर स्वच्छता, पावसाचा त्रास होऊ नये म्हणून शेडनेट, स्वयंसेवक, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तीन ठिकाणी वाहनतळ, रुग्णवाहिका आदी व्यवस्था पुरवण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी सांगितले. या वेळी उपाध्यक्ष संभाजी धुमाळ उपस्थित होते. सासवड पोलिस ठाणे आणि पोलीस मित्र संघटनेच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.