शनिदर्शनासाठी वीरमध्ये हजारो भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 01:12 AM2019-01-06T01:12:26+5:302019-01-06T01:13:10+5:30

विविध धार्मिक कार्यक्रम : कडाक्याच्या थंडीतही सकाळपासूनच रांग

Thousands of devotees in the Veer temple | शनिदर्शनासाठी वीरमध्ये हजारो भाविक

शनिदर्शनासाठी वीरमध्ये हजारो भाविक

googlenewsNext

परिंचे : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे मार्गशीर्ष अमावस्येनिमित्त हजारो भाविकांनी श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ४.३० वाजता मूर्तीची महापूजा करून मुख्य गाभारा बंद करण्यात आला व सकाळी सहा वाजता मंदिराचा मुख्य गाभारा भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला.

सकाळी भाविकांच्या व देवस्थान ट्रस्टच्यावतीने अभिषेक करण्यात आले. १० वाजता दहीभात पूजा बांधण्यात आली होती. दुपारी १२ वाजता धूपारती होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी १.१५ मिनिटांनी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. कडाक्याची थंडी असूनही पहाटेपासून देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरातील दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. शनिअमावस्येनिमित्त येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, दर्शनरांगा, मंदिर परिसर स्वच्छता, पार्किंग, होमगार्ड व सासवड पोलीस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त करण्यात आला होता, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी सांगितले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बारामतीचे सदाशिव बापू सातव व अविनाश शंकरराव धुमाळ यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष संभाजी धुमाळ, ट्रस्टचे विश्वस्त दत्तात्रय धुमाळ, सचिव सय्यद मुलाणी, दिलीप धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, बबन धसाडे, नामदेव जाधव, अशोक वचकल, सुभाष समगीर उपस्थित होते.

सकाळी अभिषेक व दहीभात पूजा
४दुपारी धुपारती नंतर मंदिराचा गाभारा काही काळ बंद
४दुपारी दीड नंतर गाभारा पुन्हा उघडल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी
४मंदिराच्या दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता.

Web Title: Thousands of devotees in the Veer temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे