इंग्रजी माध्यमाची हजारो मुले मराठी शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:41+5:302021-06-25T04:08:41+5:30
चाकण : खेड तालुक्यात मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली आहे. शाळांमधून भौतिक सुविधा, स्पर्धापरीक्षा, नावीन्यपूर्ण उपक्रम, ...
चाकण : खेड तालुक्यात मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली आहे. शाळांमधून भौतिक सुविधा, स्पर्धापरीक्षा, नावीन्यपूर्ण उपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर यामुळे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागले आहे. नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध व मंथन यांसारख्या स्पर्धापरीक्षांच्या कार्यशाळा, सराव परीक्षा व नियमित मार्गदर्शन मिळू लागल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील मुले मराठी शाळेत दाखल होऊ लागली आहेत. गेल्या तीन वर्षांत खेड तालुक्यात एकूण दोन हजार १५५ मुले इंग्रजी माध्यमातून पुन्हा मराठी माध्यमात दाखल झाली आहेत अशी माहिती गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
जिल्हा परिषद शाळांत क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा, विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर तसेच मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती, विविध शासकीय योजनांचा लाभ, सायकली, दुपारचे भोजन व लेखन साहित्य विद्यार्थ्यांना मिळत असल्याने गरीब, होतकरू मुलांनाही शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक हे उच्चशिक्षित असून नावीन्यपूर्ण उपक्रम, जादा तास, स्पर्धापरीक्षांचा सराव, वैयक्तिक मार्गदर्शन, मातृभाषेतून अध्यापन व तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला गेला आहे.
अभ्यासक्रमातील नवनवीन बदल व तंत्रज्ञानाचा वापर याचे प्रशिक्षण, प्रोत्साहन, तसेच पुरेसे वेतन शिक्षकांना मिळत असल्याने ते प्रामाणिकपणे अध्यापनाचे काम करतात . मेडिकल, इंजीनियरिंग , कृषी व स्पर्धापरीक्षांचा विचार करता आजही मराठी माध्यमातील मुलांचा वरचष्मा दिसून येतो.
इंग्रजी माध्यमामुळे मुलांचे शिक्षण इंग्रजीतून आणि घरातील संभाषण मराठीतून होत असे, यामुळे मुलांना व्यवस्थित आकलन होत नव्हते. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांना चांगले आकलन होते. हसत-खेळत शिक्षणामुळे बालपण अनुभवायला मिळते. विविध उपक्रमातून त्यांचा सर्वांगीण विकास होतो . हे आता पालकांना पटू लागले आहे.
मनोहर मोहरे (उपक्रमशील शिक्षक - पठारवाडी )
प्राथमिक शाळांतील बहुतांश शिक्षक हे उच्चशिक्षित असून तंत्रज्ञानातही त्यांचा हातखंडा आहे. तंत्रज्ञानाच्या वापराने तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये डिजिटल क्रांती घडून आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा समतोल विकास साधला जात आहे.
मच्छिंद्र शेटे ( तंत्रस्नेही शिक्षक - वराळे )