हिरडा झाडांची सातबाऱ्यावर नोंद नसल्याने हजारो शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:09 AM2020-12-23T04:09:40+5:302020-12-23T04:09:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यातील हजारो हिरडा उत्पादक शेतक-यांचे ...

Thousands of farmers are deprived of compensation due to non-registration of Hirda trees on Satbari | हिरडा झाडांची सातबाऱ्यावर नोंद नसल्याने हजारो शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित

हिरडा झाडांची सातबाऱ्यावर नोंद नसल्याने हजारो शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यातील हजारो हिरडा उत्पादक शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात इतर उत्पादन घेणा-या सर्व शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाली. परंतू हिरडा उत्पादक शेतक-यांची केवळ सातबा-यावर नोंद नसल्याने आजही नुकसान भरपाईच्या लाभा पासून वंचित आहेत. यामुळेच तातडीने हिरडा झाडांची सातबा-यावर नोंद करण्याची मागणी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

हिरडा झाडांची सातबारावर नोंद नाही ती करण्यासाठी आदेश देण्यात आले पाहिजेत.यासाठी अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांनीही पुढाकार घेतला पाहिजे.

राज्यासह पुणे जिल्ह्यात जून च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव,खेड या तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकरी बांधवाना मोठा फटका बसला. या तालुक्यातील आदिवासी वर्गाचे मुख्य उत्पनाचे साधन असलेल्या हिरडा या गौणवनउपज झाडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हिरडा या औषधी गौणवनउपज फळाचा ऐन हंगाम असतानाच हे चक्रीवादळ झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले. हिरड्याच्या उत्पनातून वर्षभर स्थानिक आदिवासींचा गुजराना होत असतो. हिरडा या झाडांच्या झालेल्या, नुकसानीचे पंचनामे देखील झाले. तालुका स्तरीय महसूल यंत्रणेने हे पंचनामे जिल्हास्तरीय यंत्रणेकडे सुपूर्त केलेले आहे. तरीही अद्याप येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, असे लेखी पत्र किसान सभेने दिले.

जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळात नुकसानं झालेल्या इतर ठिकाणच्या अनेक शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली देखील आहे. परंतु आदिवासी भागातील शेतकरी अजूनही नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. महसूल विभागाने त्वरीत दखल घेतली नाही तर संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Web Title: Thousands of farmers are deprived of compensation due to non-registration of Hirda trees on Satbari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.