भीमा नदीत हजारो मासे मृत्युमुखी, पाणी झाले दूषित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 12:58 AM2019-03-20T00:58:15+5:302019-03-20T00:58:32+5:30
खेड तालुक्यातून जाणाऱ्या भीमा नदीला जलपर्णीचा विळख्यामुळे नदीपात्रातील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत.
दावडी : खेड तालुक्यातून जाणाऱ्या भीमा नदीला जलपर्णीचा विळख्यामुळे नदीपात्रातील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. शिरोली, होलेवाडी, मांजरेवाडी, मलघेवाडी, खरपुडी आदी गावांसह भीमा नदीकाठीवरील लोकांचे आरोग्य आणि जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
शेतीला पाणी मिळावे म्हणून जलसंपदा विभागाने ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बाधले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह संथ राहतो. त्यामुळे सर्वच ठिकाणी जलपर्णी जागीच तरंगून राहत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून नदीतील लाखो मासे मृत्युमुखी पडत आहे. परिणामी, या भीमाकाठी गावामध्ये अधिकच दुर्गंधी पसरून या दोन्ही नदीकाठांवरील गावांना डासांचा प्रादुर्भाव जाणवतो. भीमा नदीच्या पाण्याचा वापर करणाऱ्या नदीकाठच्या गावातील लोकांचे व जलचराचे आरोग्य जलप्रदूषणामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भीमा नदीला अनेक समस्यांचा विळखा पडला आहे.
दूषित पाणी, त्यात नायट्रेट-फॉस्फेटचा भरपूर अंश आणि वरून भरपूर सूर्यप्रकाश यामुळे जलपर्णीची वेगाने वाढ होते. यामुळे जलचरांना प्राणवायुचा पुरवठा होत नसल्याने नदीतील हजारो मासे दररोज मृत पडत आहे. या मृत माशांमुळे नदी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पाण्यालाही दुर्गंधी येत आहे. मासेमारी करणाºया काही व्यक्ती जमेल तसे हे काठावर आलेले मृत मासे घेऊन जात आहे.