पुणे-मुंबई या महानगरांना जोडणारी 'लाईफलाईन' बंद; हजारो चाकरमान्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 07:22 PM2021-02-13T19:22:44+5:302021-02-13T19:25:03+5:30
पुणे- मुंबई रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी
पिंपरी : पुणे व मुंबई या दोन महानगरांना जोडणारी रेल्वेसेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने हजारो हात बेरोजगार झाले आहेत. या दोन्ही शहर व परिसरातील हजारो कामगार, कर्मचारी, अधिकारी लॉकडाऊनपूर्वी दररोज कामाच्या ठिकाणी रेल्वेने ये-जा करीत होते. त्यांच्यासाठी लाईफलाईन असलेली ही रेल्वेसेवा अद्याप पूर्ववत झाली नसल्याने त्यांच्या नोकरीवर गदा आली आहे.
पुणे व मुंबई दरम्यान रेल्वेकडून डेक्कन क्वीन व इंद्रायणी एक्सप्रेस अशा काही गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र प्रवाशांना मासिक पास उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. तसेच या गाड्या सुपरफास्ट असल्याने पिंपरी, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, वडगाव मावळ, कर्जत, पनवेल, कल्याण, डोंबिवली, ठाणे आदी स्थानकांवर या गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांना या गाड्यांनी प्रवास करणे शक्य होत नाही. त्यासाठी सिंहगड व सह्याद्री एक्सप्रेस सुरू करण्यात यावी. पुणे ते मुंबई दैनंदिन प्रवास करणा?्या प्रवाशांसाठी मासिक पास उपलब्ध करून देण्यात यावेत, मुंबईच्या धर्तीवर पुणे ते लोणावळा लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठीही सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
शासकीय अधिकारी, कर्मचारी, खाजगी आस्थापानांमधील कामगार आदी पुण्याहून मुंबईत दररोज ये-जा करतात. त्यांच्यासाठी रेल्वे हे अतिमहत्वाचे, वेगवान व आर्थिकदृष्टीने परवडणारे प्रवासाचे साधन आहे. कर्तव्यावर उपस्थित न राहिल्यास त्यांचे वेतन कपात केले जाते, तसेच सतत गैरहजर राहिल्यास कामगारांच्या नोकरीवर गदा आली आहे. हे कर्मचारी व कामगार मध्यमवर्गीय असल्यामुळे रेल्वेचे दररोज आरक्षण करणे त्यांना परवडणारे नाही तसेच ते त्रासदायकही आहे. त्यासाठी महिन्याला पाच ते सहा हजार रुपए खर्च होतात. तसेच लोणावळ्यापर्यंत खासगी वाहन किंवा दुचाकीने ये-जा करावी लागते.
चाकरमाने, व्यावसायिक व विद्यार्थ्यांची गैरसोय
रेल्वेसेवा बंद असल्याने चाकरमाने, भाजीविक्रिते दूग्ध व्यावसायिक व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यासाठी पुणे-लोणावळा लोकल व पुणे - मुंबई रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष व पुणे रेल्वे विभागीय सल्लागार समितीचे (डीआरयूसीसी) सदस्य ईक्बाल मुलाणी यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागणीचे निवेदन दिले आहे.