पालिकेच्या तिजोरीत मिळकतकराचे हजार कोटी
By admin | Published: December 31, 2016 05:37 AM2016-12-31T05:37:38+5:302016-12-31T05:37:38+5:30
महापालिकेच्या तिजोरीत फक्त मिळकतकर विभागाचे म्हणून डिसेंबरअखेर तब्बल १ हजार १ कोटी रुपये जमा झाले आहेत. डिसेंबपर्यंतच्या वसुलीचा हा आतापर्यंतचा उच्चांक
पुणे : महापालिकेच्या तिजोरीत फक्त मिळकतकर विभागाचे म्हणून डिसेंबरअखेर तब्बल १ हजार १ कोटी रुपये जमा झाले आहेत.
डिसेंबपर्यंतच्या वसुलीचा हा आतापर्यंतचा उच्चांक असून नोटाबंदीमुळेच पालिकेला त्यातील सुमारे १६४ कोटी रुपये मिळाले आहेत. आर्थिक वर्षअखेरीपर्यंत (मार्च २०१७) मिळकतकर विभागातून एकूण १ हजार ६०० कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
दरम्यान, आयुक्त कुणाल कुमार यांनी या विक्रमी वसुलीबद्दल मिळकत कर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी व त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. पालिकेला या वेळी एकूण १ हजार ४०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. सुरुवातीच्या दोन महिन्यांत कर जमा केला, तर सवलत मिळत असल्यामुळे या दोन महिन्यांतच पालिकेकडे मोठा कर जमा झाला. त्यानंतर विविध गटांसाठी अभय योजना राबवून प्रशासनाने वसुलीत वाढ केली.
- नोटबंदीमुळे फक्त एकाच महिन्यात पालिकेला एकदम १६४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून आता एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्यांतच पालिकेला एकदम १ हजार १ कोटी रुपये मिळाले आहेत. नागरिकांनी रांगा लावून रात्री १२ वाजेपर्यंत जुन्या नोटांच्या स्वरूपात कर जमा केला. अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त कर जमा करणाऱ्यांची संख्या ३५० पेक्षा जास्त आहे.